रक्षाबंधन, ज्याला राखी म्हणून देखील ओळखले जाते, रक्षाबंधन हा सण श्रावणातील पौर्णिमेला येतो. यालाच नारळी पौर्णिमा असे देखील म्हणतात. हा सण भारत आणि दक्षिण आशियातील इतर भागांमध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जाणारा हिंदू संस्कृतीतील पारंपारिक सण आहे. “रक्षा बंधन” या नावाचा अर्थ “संरक्षणाचे बंधन” असा होतो. भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाच्या बंधनाचा हा सण आहे.
रक्षा बंधन म्हणजे भावंडांचे प्रेम, एकमेकांमधील बांधिलकी आणि रक्षणाचे वचन यासाठी साजरा केला जाणारा हा सण. या उत्सावामागे अनेक कथा आपल्या पुराणांमध्ये आणि इतिहासात सांगितलेल्या आहेत.
रक्षाबंधनाचा मंत्र
येन बद्धो बलीराजा दानवेन्द्रो महाबल:।
तेन त्वा अनुबंध्नामि रक्षे मा चल मा चल:।।
रक्षाबंधनाच्या पूजेची पद्धत
रक्षाबंधनाच्या दिवशी घरामध्ये स्वच्छ जागेवर पाट मांडावा, त्यापुढे सुंदर रांगोळी काढावी. भावाला त्या पाटावरती बसवावे. पूजेचे ताट तयार करून बहिणीने भावाच्या कपाळावर टिळा (लाल कुंकू ) लावावे अक्षदा लावाव्या त्यानंतर भावावरून दिवा ओवाळावा आणि त्याच्या हाताला मंत्र उच्चार करून राखी बांधावी. भाऊ आपल्या बहिणीला प्रत्येक संकटामध्ये तिचे संवरक्षण करण्याचे वचन देतो. त्यानंतर बहिणीला काहीतरी छोटेशी भेटवस्तू देतो.
रक्षाबंधन का साजरी केली जाते? रक्षाबंधनचे महत्व
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या हाताला (मनगटाभोवती) राखी ( पवित्र धागा) बांधतात. हा धागा बहीण आपल्या भावाचे कुठल्याही संकटामध्ये संवरक्षण व्हावे म्हणून त्याच्या हाताला बांधते आणि भाऊ बहिणीला तिच्या आयुष्यातील कुठल्याही संकटामध्ये तिचे संवरक्षण करण्याचे वाचन देतो. विवाहित महिला आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जातात. या प्रथेमुळे भाऊ आणि बहिणीतील प्रेमाचे नातं घट्ट होते. निस्वार्थ प्रेमाचे उत्तम उदाहरण म्हणजे भावा-बहिणीचं सुंदर नातं होय. म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये रक्षाबंधन ला फार महत्व आहे.
रक्षाबंधनची सुरुवात कशी झाली? | रक्षाबंधनची कथा ( इतिहास )
रक्षाबंधन बद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. त्या खालील प्रमाणे…
इंद्र आणि इंद्राणी कथा
पूर्वी देव आणि दानवांमध्ये खूप युद्ध झाले त्या युद्धामध्ये दानवांच्या शक्तीपुढे देवांची शक्ती कमी पडू लागली. वृत्रासुर या दानवांच्या राजाने इंद्रदेवाला युद्धासाठी आव्हान दिले. इंद्रदेवाची पत्नी शची हिला भगवान विष्णू यांनी एक धागा ( राखी )दिला होता. तिची अशी श्रद्धा होती की त्या धाग्यामुळे इंद्रदेवाचे सांवरक्षण होईल. इंद्रदेवाच्या पत्नीने तो दोरा पतीच्या सांवरक्षणासाठी इंद्रदेवाच्या हाताला बांधला. ज्यामुळे इंद्रदेवाचे सांवरक्षण झाले आणि देवतांचा त्या युद्धामध्ये विजय झाला. आणि युद्धामध्ये गमावलेले सर्व वैभव देवतांना परत मिळाले. तेव्हापासून रक्षाबंधनाची सुरुवात झाली असे म्हटले जाते.
द्रौपदी आणि श्रीकृष्णाची कथा
भारताचे महाकाव्य महाभारत यातील कथेनुसार, भगवान कृष्णाने अनवधानाने स्वतःला जखमी केले होते. भगवान श्री कृष्णाच्या मनगटातून वाहणारे रक्त थांबविण्यासाठी पांडवांची पत्नी द्रौपदी हीने तिच्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णाच्या हाताला बांधला. त्यांच्यामध्ये भाऊ आणि बहीणचे प्रेमाचं नातं निर्माण झाले. भगवान श्री कृष्णाने द्रौपदीला वचन दिले “मी तुझे प्रत्येक संकटामध्ये रक्षण करीन”.
यम आणि यमुनाची कथा
यमराज आणि यमुना हे दोघं भगवान सूर्यदेव आणि संज्ञा देवीचे पुत्र व कन्या होते. दोघांचे बालपण एकत्र गेले. यमराज आणि यमुना दोघे भाऊ बहीण होते, यमराज आपल्या कामामुळे कित्येक वर्ष आपल्या बहिणीला भेटले नव्हते. यमुना रोज आपल्या भावाची वाट बघत आणि रोज मनोभावे त्याच्या भेटीची प्रार्थना करत होती.
यमुनाने मनोभावे इच्छा केली की, “माझा भाऊ माझ्या घरी यावा, आणि मी त्याला प्रेमाने भोजन वाढून राखी बांधावी.” ती रोज मनोभावे प्रार्थना करत आणि भावाची वाट बघत असे.
एक दिवस यमराजला बहिणीच्या प्रेमाचं स्मरण झाले. तो यमलोकातून यमुनेकडे तिला भेटण्यासाठी आला. यमुनेला अतिशय आनंद झाला. तिने भावाचे स्वागत केले. गंध लावला, आरती केली आणि राखी बांधली. बहिणीचे हे प्रेम बघून आणि तिला झालेला आनंद बघून
यमराज खूप भावूक झाले.
यमराज तिला म्हणाले, “तू काही वर माग, मी तुझं रक्षण करेन.”
यमुने कोणताही भौतिक वर न मागता ती म्हणाली
“हे भाऊ, तू मला जेवढा आनंद दिलास, तोच आनंद इतर बहिणींनाही मिळावा. आणि प्रत्येक भावाने आपल्या बहिणीचं आयुष्यभर रक्षण करावे.” हीच माझी इच्छा आहे.
यावरती यमराज तिला म्हणाले “हे प्रेम इतकं शुद्ध आहे की, आजपासून जो भाऊ आपल्या बहिणीकडून राखी बांधून तिचं रक्षण करण्याचं वचन देईल, त्याला मी दीर्घायुष्य आणि यश देईन.”
तेव्हापासून रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ- बहीण राखीच्या माध्यमातून आपले प्रेम, रक्षण आणि विश्वासाचं नातं घट्ट करतात.
राजा बलि आणि लक्ष्मीदेवी कथा
राजा बलि हा अत्यंत बलाढ्य आणि दानी राजा होता. त्याने आपल्या तप, यज्ञ आणि दानशक्तीने स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांवर आपला प्रभाव निर्माण केला. त्याच्या या प्रभावामुळे सर्व देव घाबरले व ते सर्व भगवान विष्णूंकडे मदतीसाठी गेले.
भगवान श्री विष्णूंनी “वामन अवतार”, म्हणजे एका बटू ब्राह्मण बालकाचा अवतार घेतला. आणि बलि राजा यांच्याकडे गेले. आणि राजाला विनंती केली “मला फक्त तीन पावलं जमीन द्या.” राजा बलि हसला आणि म्हणाला एवढंच का? आणि त्याने वामनाला तीन पावलं जमीन देण्याचं वचन दिले.
त्यानंतर वामनाने पहिलं पाऊल ठेवले तर संपूर्ण पृथ्वी व्यापली गेली. दुसरं पाऊल ठेवले तर आकाश व्यापलं. आणि तीसऱ्या पावलासाठी जागा उरली नाही मग बलिने आपले डोके पुढे केले आणि विष्णूंनी तिसरं पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवले. त्यानंतर बली राजाला पाताळ लोकात स्थान देण्यात आलं.
राजाची आपल्याबद्दलची भक्ती बघून विष्णू स्वतः त्याच्या पाताळराज्यात वास्तव्याला गेले. लक्ष्मीदेवीला हे पाहून खूप वाईट वाटले. भगवान विष्णूला आणण्यासाठी लक्ष्मी पाताळात गेली. सामान्य स्त्रीचे रूप घेऊन राजाकडे गेली आणि म्हणाली मला कोणीच नाही. आज रक्षाबंधन आहे मी तुला राखी बांधते तू माझे रक्षण कर.
राजाने तिच्याकडून राखी बांधून घेतली आणि तिच्या रक्षणाचे वाचन दिले. लक्ष्मीने राजाकडे मागणी केली “माझा पती विष्णू तुमच्याकडे आहे. मला तो परत हवा आहे.” राजा बलि आश्चर्यचकित झाला पण राखीच्या नात्यासाठी, त्याने विष्णूंना परत जाण्याची परवानगी दिली.
राणी कर्णावती आणि हुमायून कथा
आणखी एक अशी आख्यायिका आहे की मेवाडची राणी कर्णावती ही मुघलांचा सम्राट हुमायू याला भाऊ मानून राखी पाठवते. आणि तिचे राज्य संकटात असताना ती हुमायूकडे मदत मागते. राणी त्या संकटामध्ये हुमायू तिला मदत करतो.
हे देखील वाचा –
- छत्रपती शिवाजी महाराज – जन्म, मृत्यू, पत्नी आणि इतिहासाबद्दल काही माहिती
- श्री हनुमान जयंती / अंजनेय यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
- प्रभू श्री रामांना मर्यादापुरुषोत्तम असे म्हणतात? आणि रामायणातील काही गुड रहस्यांबद्दल माहिती.
- गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमेबद्दल संपूर्ण माहिती व कथा
- हरतालिकेचे महत्व काय?
- श्रीकृष्णजन्माष्टमीची कथा, माहिती, इतिहास
- नवरात्री : नवरात्री कथा, आदिशक्तीची निर्मिती का आणि कशी झाली? दुर्गा देवीची संपूर्ण रूपे, नावे आणि त्यांचे महत्व.
- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज ( छावा ) – एक पराक्रमी निडर योद्धा
- भारतीय सिल्क साडी बद्दल संपूर्ण माहिती आणि प्रकार
- पुरुषांसाठी आणि नवरदेवासाठी कॉमेडी मराठी उखाणे
- बैलपोळा का साजरा केला जातो? जाणून घ्या कथा आणि संपूर्ण माहिती
- पैठणी साडी चे प्रकार, कलर आणि इतिहासाबद्दल संपूर्ण माहिती
- आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी बद्दल संपूर्ण माहिती




