Home Cultural India छत्रपती शिवाजी महाराज – जन्म, मृत्यू, पत्नी आणि इतिहासाबद्दल काही माहिती | chhatrapati shivaji maharaj information and history
    Cultural IndiaEvents

    छत्रपती शिवाजी महाराज – जन्म, मृत्यू, पत्नी आणि इतिहासाबद्दल काही माहिती | chhatrapati shivaji maharaj information and history

    Chhatrapati Shivaji Maharaj
    Chhatrapati Shivaji Maharaj

    छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj ) शिवगर्जना घोषणा :
    आस्ते कदम… आस्ते कदम…आस्ते कदम… महारा s s s ज, गडपती, भूपती, प्रजापती, गज-अश्वपती, जळपती, सुवर्णरत्नश्रीपती, अष्टवधानजागृत, अष्टप्रधानवेष्टित, न्यायालंकारमंडित, शस्रास्त्रशास्त्रपारंगत, राजनीतीधुरंधर, प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री श्री श्री राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो.

    ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवगर्जना. ही शिवगर्जना वाचून आला की नाही अंगावर शहारा.. हो असेच होते आपले छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या कारकिर्दी विषयी जितकं बोलावं  तितकं कमीच आहे. 

    निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी । यशवंत किर्तीवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवंत नितीवंत । जाणता राजा ।

    समर्थ रामदास स्वामींनी या ओवी मधून छत्रपती शिवाजी महाराजांचे अतिशय सुंदर आणि मार्मिक वर्णन केलेले आहे. जे जगाने केले ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केले नाही आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केले ते जगाला कधीच जमले नाही. म्हणूनच तर आज संपूर्ण जग छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानते आणि  त्यांच्यासमोर नतमस्तक होते.

    शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? | Where was Chhatrapati Shivaji Maharaj born?

    महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी शुक्रवारी सूर्यास्तानंतर पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावरती एका रत्नाचा जन्म झाला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. असे म्हणतात की राजमाता जिजाऊ यांनी रयते वरती होणारा अन्याय बघून धाडसी आणि शूरवीर पुत्र होण्यासाठी शिवाई देवीला नवस केला होता. म्हणूनच जिजाऊ यांनी महाराजांचे नाव शिवाजी ठेवले.

    शिवाजी महाराजांचे वडील शाहजी भोसले हे विजापूर सल्तनतीच्या सैन्यात एक मराठा सेनापती होते आणि त्यांची आई जिजाबाई या प्रतिभावान आणि हुशार होत्या. शहाजी भोसले आणि जिजाबाई यांना दोन मुले होती. त्यात मोठा मुलगा राजे संभाजी हे वडिलांसोबत असत आणि शिवाजी राजे हे जिजाबाई सोबत राहत असे.

    लहानपणापासूनच जिजाबाईंनी शिवाजी राजे यांना उत्तम संस्कार, युद्ध रणनीती, माता-भगिनींचा आदर करणे, गरीबांचा आधार होणे आणि अन्याय विरुद्ध लढण्याचे धडे दिले.

    शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्माण करण्याकडे वाटचाल | Chhatrapati Shivaji Maharaj’s move towards creating Swaraj

    वयाच्या 16 व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावरती रायरेश्वराच्या पिंडीसमोर स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. शहाजी महाराजांनी स्वराज्याची सर्व जबाबदारी माता जिजाऊ आणि शिवाजी महाराजांकडे दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल राजवटीला विरोध करून 17 व्या शतकात भारतात मराठा राज्याची स्थापना केली. 

    स्वराज्य निर्माण करायचे असेल तर गड किल्ले काबीज करणे महत्त्वाचे होते त्यामुळे महाराजांनी लहान-मोठ्या सर्व माणसांना एकत्र आणले आणि या सर्वांना मावळे असे नाव दिले. काही निष्ठावान आणि विश्वासू माणसांसोबत आपल्या आस-पासची गडकिल्ले काबीज करण्यास सुरुवात केली. सर्वात पहिले तोरणा किल्ला काबीज केला त्यानंतर हळूहळू महाराजांनी एक-एक करत असे 360 किल्ले काबीज केले.

    अफझलखानाचा वध | Assassination of Afzal Khan

    छ. शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 ला अफझल खानाचा वध केला होता.

    विजापूरच्या आदिलशहाचा सरदार अफझल खान आणि शिवाजी महाराजांमध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी संघर्ष झाले. यामध्ये महाराजांनी अफजलखानाच्या पोटात वाघ नख्या खूपसून अफझल खानाला ठार मारले. अफझल खान हा हजारो सैन्य घेऊन आलेला होता आणि महाराजांकडे अगदी मुठभर मावळे होते, परंतु महाराजांनी मोठ्या चतुराईने अफजलखाना सह त्याच्या सैन्याचा नायनाट केला.

    महाराजांनी जेव्हा अफजलखानाला मारले त्यावेळेस महाराजांचे वय फक्त 29 वर्षे होते. आणि आजही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेची आठवण म्हणून शिवप्रताप दिन साजरा केला जातो.

    पन्हाळगडावरील वेढा | Siege of Panhalgad

    1660 मध्ये पन्हाळगडाच्या वेढ्यामध्ये महाराज अडकून पडले होते. महाराजांना त्या वेढ्यातून निसटता येईना. जुलै महिन्यातील 12 आणि 13 तारखेला महाराजांनी पन्हाळगडावरून निसटण्याचा निर्णय घेतला. महाराज अतिशय चतुराईने पन्हाळगडावरून निघाले. परंतु शत्रू महाराजांच्या मागावरच होते, रस्त्यामध्ये आलेल्या घोडखिंडीमध्ये शत्रू महाराजांजवळ पोहोचले. खिंड अतिशय अरुंद आणि अवघड होती.

    त्यावेळेस बाजीप्रभू यांनी महाराजांना पुढे जाण्यास सांगितले आणि स्वतः त्या खिंडीमध्ये शत्रूला रोखण्यासाठी थांबले आणि महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफेचा बार करण्यास सांगितले..बाजीप्रभूंनी त्यांच्या श्वासात श्वास असेपर्यंत या खिंडीमध्ये शत्रूला थांबून धरले. आणि जेव्हा तोफेचा आवाज ऐकू आला त्यावेळेस बाजीप्रभूंनी आपले प्राण सोडले. म्हणून या खिंडीला पावनखिंड असे नाव देण्यात आले.

    सुरतची लूट

    स्वराज्य निर्मितीसाठी महाराजांना धनाची आवश्यकता होती आणि तसेच मुघल दरबारामध्ये महाराजांना त्यांची दहशत निर्माण करायची होती. त्यामुळे महाराजांनी 1664  मध्ये सुरत वरती हल्ला करून सुरत लुटले. सुरत हे शहर निवडण्याचे कारण म्हणजे मुघलांचा मोठा कारभार या ठिकाणी होत असे आणि सुरत मधून फार मोठ्या प्रमाणात मुघलांना कर वसुली मिळत असे. तसेच सुरत मध्ये मोठ मोठे व्यापारी देखील रहात होते. सुरत हे मुघलांचे प्रमुख बंदर होते आणि मुघलांचा संपूर्ण व्यापार या बंदरावरूनच होत असे.

    त्यानंतर महाराज आग्रा भेटीला गेल्यानंतर तिथे त्यांना कैद करण्यात आले आणि औरंगजेबच्या कैदेतून चतुराईने सुटका झाल्यानंतर महाराज परत स्वराज्यामध्ये आले. स्वराज्यात आल्यानंतर पुरंदरचा तह झाला. आणि त्यानंतर सहा वर्षांनी ऑक्टोबर 1670 मध्ये परत महाराजांनी सुरत वर दुसऱ्यांदा हल्ला केला आणि ह्या वेळेस ची लुट ही तीन दिवस चालू होती. या दुसऱ्या लुटी नंतर मात्र सुरत मधील सर्वांना महाराजांची धास्ती भरली होती. 

    महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये असे अनेक धाडसी कार्य केले होते ज्याची आपण कितीही वर्णन केले तरी ते कमीच आहे.

    शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या? | How many wives did Chhatrapati Shivaji Maharaj have?

    शिवाजी महाराजांना एकूण आठ पत्नी होत्या. या ठिकाणी त्यांच्या माहेरच्या आडनावांसह त्यांची नावे दिलेली आहेत. तसेच महाराजांचे दोन मुले आणि सहा मुली यांची नावे दिलेली आहेत.

    • सईबाई निंबाळकर – मुलगा छत्रपती संभाजी राजे, मुली  सकवार  उर्फ सखुबाई, राणूबाई व अंबिकाबाई या तीन मुली झाल्या. 
    • सोयराबाई मोहिते – मुलगा राजाराम,  मुलगी बाळाबाई उर्फ दीपाबाई.
    • सकवारबाई गायकवाड – मुलगी कमळजाबाई.
    • काशीबाई जाधव
    • पुतळाबाई मोहिते
    • सगुनाबाई शिर्के – नानीबाई उर्फ राजकुवर.
    • लक्ष्मीबाई विचारे
    • गुणवंतीबाई इंगळे

    शिवाजीचा महाराजांचा मृत्यू कसा आणि कधी झाला? | How and when did Shivaji Maharaj die?

    3 एप्रिल, 1680 हा महाराष्ट्रासाठी तसेच संपूर्ण रयतेसाठी अतिशय काळा दिवस होता. याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला आणि हनुमान जयंतीच्या दिवशी रायगडावरती महाराजांचे निधन झाले. 

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यु बद्दल स्पष्ट पुरावे नाहीत. काही लेखकांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांना तीव्र ताप असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. महाराजांनी इंग्रजांकडून विषमज्वराची औषधे मागवल्याचाही उल्लेख इंग्रजी पत्रांमध्ये आहे.

    तर काही इतिहासकारांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या पत्नी सोयराबाई ह्या त्यांच्यावर नाराज असल्यामुळे त्यांनी विष प्रयोग केला असे म्हटले जाते. पण याची पूर्ण सत्यता अद्यापही कुणाला माहित नाही. काही लोकांच्या मते महाराजांना 12 दिवस सलग ताप असल्यामुळे महाराजांचा मृत्यू झाला.

    तसेच काही इतिहासकारांच्या मते महाराजांना गुडघी आजार झाल्याचे असे देखील म्हटले जाते. महाराजांच्या मृत्यूबद्दल कुठलाही समकालीन असा ठोस पुरावा नाही. विविध इतिहासकारांचे पुस्तकांमधील हे मत आहे.

    अतिशय लहानपणापासूनच महाराजांनी स्वराज्याची धुरा आपल्या हातात घेतली. त्यामुळे विविध ठिकाणी महाराजांचे जाणे असायचे. नेहमी वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये मोहिमा असायच्या. सततच्या वातावरण बदलामुळे महाराजांच्या शरीरावर त्याचा हळूहळू परिणाम होत गेला.

    तसेच त्या काळामध्ये आजारांवरती योग्य उपाय देखील उपलब्ध नव्हते. त्यामुळे अत्यंत कमी वयातच महाराजांचे निधन झाले. महाराजांचे निधन नेमके कुठल्या कारणामुळे झाले याबाबत योग्य खात्रीशीर पुरावे उपलब्ध नाहीत.

    शिवाजी महाराज किती वर्षे जगले? | How many years did Shivaji Maharaj live?

    छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 मध्ये झाला, एकूण छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण आयुष्य हे 50 वर्षे 1 महिना आणि 13 दिवस इतके होते.

    हे देखील वाचा ;-

    Related Articles

    dussehra
    Cultural IndiaEvents

    दसरा का साजरा केला जातो? पूजा विधी, कथा व संपूर्ण माहिती

    दसरा, भारतीय संस्कृतीमध्ये दसरा हा सण अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो. हा...

    navratri
    EventsCultural India

    नवरात्रीच्या ९ दिवसांचे महत्त्व काय? आणि का साजरी केली जाते?

    आदीशक्ती जगन्माता आई भगवतीने या विश्वाच्या कल्याणासाठी उन्मत्त झालेल्या असुरांसोबत ९ दिवस...

    हरतालिका व्रत कथा
    Cultural IndiaEvents

    हरतालिकेचे महत्व काय?

    हरतालिका हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला येते. हरतालिका हा सण...

    बैलपोळा
    Cultural IndiaEvents

    बैलपोळा का साजरा केला जातो? | पिठोरी अमावस्या

    बैलपोळा हा भारतीय संस्कृतीमधील शेतकऱ्यांसाठी विशेष महत्वाचा सण आहे. शेतकऱ्याच्या कष्टामधील खरा...