Home Cultural India हरतालिकेचे महत्व काय?
    Cultural IndiaEvents

    हरतालिकेचे महत्व काय?

    हरतालिका व्रत कथा
    हरतालिका व्रत कथा

    हरतालिका हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला येते. हरतालिका हा सण नसून एक व्रत आहे. हिंदू संस्कृतीमध्ये महिलांसाठी हा अत्यंत महत्वाचा आणि त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे. भारतातील महाराष्ट्रासह बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या प्रदेशांमध्ये महिला हे व्रत अतिशय उत्साहाने साजरे करतात. माता पार्वती यांनी भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते. 

    हरतालिका म्हणजे काय?

    हरतालिका या शब्दाचा अर्थ “हरित म्हणजे हरण” आणि “आलिका म्हणजे मैत्रीण”, म्हणजेच मैत्रिणीचे हरण करणे होय. या संपूर्ण घटनेमध्ये पार्वती मातेच्या सखीचे खूप मोठे योगदान होते. म्हणून हरतालिकेच्या दिवशी शिव – पार्वती सोबत त्यांची सखी यांची पूजा केली जाते.

    हरतालिका व्रत कथा | हरतालिका तीज

    एक दिवस भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. माता पार्वती यांनी भगवान शंकरांना विचारले “सर्व व्रतांमधे चांगले व्रत कोणते? ज्यामध्ये कष्ट कमी परंतु त्याचे फळ पुष्कळ, असे एखादे व्रत असेल तर मला सांगा. आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हे ही मला सांगा.” तेव्हा भगवान शंकर माता पार्वतीला म्हणाले, “जसा नक्षत्रांमध्ये चंद्र श्रेष्ठ, ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ, चार वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ, देवांमध्ये विष्णु श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे सर्व व्रतांनमध्ये हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस. हे व्रत भाद्रप्रद महिन्यातील पहिल्या तृतीयेला येते.

    तू जेव्हा लहान होतीस तेव्हा ‘मी तुला प्राप्त व्हावे’ म्हणून मोठे तप केलेस. कठोर उपवास केलास, झाडाची पाने आणि कंदमुळे खात होतीस. थंडी, पाऊस, ऊन सर्व दुःख सहन केले. हे तुझे तप पाहून तूझ्या पित्याला फार दुःख झाले. ‘अशी कन्या कोणास द्यावी?’ अशी तुझ्या वडिलांना चिंता वाटू लागली. तेव्हड्यात तिथे नारदमुनी आले. पार्वती मातेचे वडील हिमालय यांनी त्यांची पूजा केली व इथे येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारदमुनी म्हणाले, “तुझी कन्या उपवर झाली आहे, ती भगवान विष्णूला द्यावी. ते पार्वतीसाठी योग्य वर आहे. त्यांनीच मला तुमच्याकडे मागणीसाठी  पाठविले आहे. म्हणून त्यासाठी मी इथे आलो आहे.”

    हिमालयाला खूप आनंद झाला. त्यांनी भगवान विष्णूंचा प्रस्ताव स्वीकारला. नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले. त्यांनी सर्व  हकीकत भगवान विष्णूंना कळविली व निघून गेले. नारदमुनी  गेल्यानंतर तुझ्या वडलांनी सर्व हकीकत तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस हे बघून तुझ्या सखीने  रागावण्याचे  कारण विचारले  तेव्हा तू म्हणालीस, “महादेवांशिवाय मला दुसरा पती करणं नाही” असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या वडलांनी मला भगवान विष्णूला देण्याचे कबुल केले आहे. यासाठी काय उपाय करावा? मग तुझी सखी तुला एका अरण्यात घेऊन गेली. तिथे गेल्यावर एका नदीजवळच एक गुहा दृष्टीस पडली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथे माझी लिंग स्वरूपात स्थापना केली. त्याची मनोभावे पूजा केलीस. फळे, पाने आणि कंदमुळे खाऊन उपवास केला. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्रभर जागरण केले. तुझ्या या उपासनेने मी प्रसन्न झालो आणि  तुला दर्शन दिले.  तुला वर मागण्यास सांगितला तेव्हा तू म्हणालीस, “तुम्ही माझे पती व्हावे, याशिवाय दुसरी इच्छा नाही,” नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो.

    दुसऱ्या दिवशी त्या व्रतपूजेचे तू विसर्जन केले. मैत्रिणीसह त्याचे पारण केलेस. तेव्हड्यात तुझे वडील तिथे आले. त्यांनी तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले. मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितली. पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचे वचन दिले. तुला घेऊन ते घरी गेले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले. अशी या व्रताने तुझी मनोकामना पूर्ण झाली. 

    हरतालिकेची पूजा कशी करावी?

    हरतालिकेच्या दिवशी उपवास करावा, एका पटवर्ती वाळूची पिंड तयार करावी त्यावर शिव पर्वत आणि सखी यांच्या वाळूच्या प्रतिमा तयार कराव्या. पूजेसाठी शक्यतो पांढरे वस्त्र परिधान करावे. बेल, पुष्प आणि पत्री वाहून पूजा करावी. त्यानंतर हरतालिकेची कथा वाचन करावे. जमलेल्या सर्व सुहासिनींना हळदी कुंकू द्यावे. रात्री महादेवाचे भजन, मंत्र उच्चार करून जागरण करावे.

    हरतालिकेच्या पूजेचे विसर्जन कधी आणि कसे करावे? | हरतालिकेच्या उपवास कधी सोडावा?

    हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी गोड नैवेद्य तयार करावा आणि पूजेच्या ठिकाणी शिव – पार्वती आणि सखी यांना नैवेद्य दाखवावा. काही ठिकाणी शिव – पार्वतीला तांदूळ आणि मुगाच्या डाळीच्या खिचडीचा नैवेद्य दाखविला जातो. सर्व सुहासिनींना हळदी – कुंकू द्यावे. देवाला नैवेद्य दाखवील्यानंतर आपण उपवास सोडावा. पाटावरील पूजेच्या सर्व साहित्याचे नदीमध्ये विसर्जन करावे.

    हे देखील वाचा –

    Related Articles

    dussehra
    Cultural IndiaEvents

    दसरा का साजरा केला जातो? पूजा विधी, कथा व संपूर्ण माहिती

    दसरा, भारतीय संस्कृतीमध्ये दसरा हा सण अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो. हा...

    navratri
    EventsCultural India

    नवरात्रीच्या ९ दिवसांचे महत्त्व काय? आणि का साजरी केली जाते?

    आदीशक्ती जगन्माता आई भगवतीने या विश्वाच्या कल्याणासाठी उन्मत्त झालेल्या असुरांसोबत ९ दिवस...

    बैलपोळा
    Cultural IndiaEvents

    बैलपोळा का साजरा केला जातो? | पिठोरी अमावस्या

    बैलपोळा हा भारतीय संस्कृतीमधील शेतकऱ्यांसाठी विशेष महत्वाचा सण आहे. शेतकऱ्याच्या कष्टामधील खरा...

    shrikrishna janmashtami
    Cultural IndiaEvents

    श्रीकृष्णजन्माष्टमी | Shri Krishna Janmashtami

    श्रीकृष्णजन्माष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्मोस्तव. भगवान श्री विष्णू यांचा आठवा अवतार म्हणजे...