यावर्षी 2024 मध्ये महाशिवरात्री ही मार्च महिन्यातील 8 तारखेला शुक्रवारी आहे. शिवरात्री हि प्रत्येक महिन्यामध्ये येत असते. परंतु माघ महिन्यातील शिवरात्रीला विशेष महत्व असते. माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशी तिथीला येणाऱ्या महाशिवरात्री ला महादेवांचा आनंदउत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.
भारतामध्ये महाशिवरात्री हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. भगवान शिवाचा आनंद उत्सव म्हणजेच महाशिवरात्री या दिवशी भगवान शिवाचे सर्व भक्त मोठ्या आनंदामध्ये भगवान शंकराची आराधना करतात. भगवान शंकराचा अभिषेक करून व्रत, जागरण, उपासना करतात आणि अगदी उत्साहात त्यांचे भजन करतात.
आणि भगवान शंकर म्हणजे आपले भोलेनाथ हे देखील त्यांच्या सर्व भक्तांना या दिवशी कृपा आशिर्वाद देतात. भारतातील विविध भागांमध्ये विविध पद्धतीने महाशिवरात्री साजरी केली जाते.
असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वती पृथ्वीवरती येतात. आणि सर्व भक्तांना आशीर्वाद देतात.
भगवान शिव म्हणजे कोण?
या ब्रम्हांडामध्ये सर्वप्रथम एक अग्नीचा मोठा गोळा होता असे सर लॉवेल शास्त्रज्ञ म्हणतो. तर आपले ऋषी वशिष्ठ म्हणतात की “तो अग्नी गोळा नसून ज्योति रूपामध्ये भगवान शिव होते”. आपल्या पूर्वीच्या ऋषीमुनींनी या ब्रह्मांडाबद्दल जे काही ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेले आहे तेच आत्ताचे शास्त्रज्ञ देखील मान्य करत आहेत. ऋषीमुनींचा आणि शास्त्रज्ञांच्या शोधाचा निष्कर्ष एकच आहे.
लिंगाचे दोन भाग असतात एक मध्यभागी असलेले पिंड त्यालाच बाण असे म्हणतात. आणि हे पिंड म्हणजेच भगवान शिव आणि या लिंगा भोवतीचा जो भाग असतो त्याला शाळुंका म्हणतात. आणि ही शाळुंका म्हणजेच माता पार्वती होय.
Maha Shivratri Mantra | महामृत्युंजय मंत्र
भगवान शिवांना प्राप्त करण्यासाठी अनेक मंत्र आहेत. परंतु सर्वात प्रभावशाली मंत्र म्हणजे महामृत्युंजय मंत्र.
“ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ||”
महामृत्युंजय मंत्राचा अर्थ – हे महादेव, आम्हा भक्तांना वारंवार संसार चक्रात टाकणाऱ्या मृत्यूच्या विळख्यातून बाहेर काढा आणि अमृतत्व म्हणजेच मोक्ष प्रदान करा.
महाशिवरात्रीची कथा | The Story of Mahashivratri
समुद्र मन्थन कथा
काही पौराणिक कथांनुसार जेव्हा देव-दैत्यांमध्ये समुद्रमंथन झाले तेव्हा मंथनामध्ये अमृता बाहेर आले त्याबरोबरच विषही त्यातून बाहेर पडले आणि हे विष इतके भयंकर होते की या विषाच्या प्रभावामुळे संपूर्ण सृष्टीला धोका निर्माण झाला.
त्यामुळे भगवान महादेवांनी हे विष स्वतः प्राशन केले आणि स्वतःच्या कंठामध्ये म्हणजेच गळ्यामध्ये ठेवले. ह्या विषाच्या प्रभावामुळे महादेवांचा कंठ निळा झाला. म्हणून महादेवांना निळकंठ असेही म्हणतात. आणि महादेवांनी संपूर्ण सृष्टीला या विनाशापासून वाचवले त्याचा आनंद उत्सव म्हणून महाशिवरात्री साजरी केली जाते.
शिकाऱ्याची कथा
काही पौराणिक दंतकथेनुसार एक शिकारी शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेला. एका तळ्याच्या काठावरती बेलाचे झाड होते त्या बेलाच्या झाडावरती तो शिकारी बसला. त्या बेलाच्या झाडाखाली एक महादेवाची पिंड बेलाच्या पानांनी झाकलेली होती.
पारधी झाडावरती बसला आणि येणारी शिकार नीट दिसावी म्हणून पारधी त्याच्या आजूबाजूची बेलाची पाने तोडून खाली टाकत होता आणि ती बेलाची पाने नेमकी महादेवाच्या पिंडीवर पडत होती.
काही वेळाने तिथे एक मादी हरीण पाणी पिण्यासाठी तळ्याच्या काठी आली तेव्हा पारध्याने तिला बाण मारण्यास घेतला. तेव्हा अचानक ती हरीण त्या पारध्याला म्हणाली की हे पारधी मी एक गर्भवती हरीण आहे. तू जर मला मारले तर माझ्यासह माझी मुलेही मारले जातील. थोड्याच वेळात माझी प्रसूती होईल, प्रसूती झाली की मी स्वतः तुझ्याकडे येईल आणि तेव्हा तू मला मार.
तिचे हे बोलणे ऐकून पारध्याला तिची दया आली आणि त्याने तिला सोडून दिले. ती हरीण प्रसूती झाल्यानंतर परत आली तिच्याबरोबर तिचे पिल्ले आणि परिवार देखील आला आणि ते सर्व पारध्याला म्हणू लागले की मला मारा- मला मारा त्यांचे एकमेकांबद्दलचे प्रेम बघून पारध्याला त्याच्या कृत्याबद्दल वाईट वाटू लागले आणि तेव्हापासून पारध्याने शिकार करणे सोडून दिले.
तो दिवस होता महाशिवरात्रीचा. रात्रभर पारध्याला शिकार न मिळाल्यामुळे उपवास घडला आणि बेलाची पाने महादेवांच्या पिंडी वरती पडल्यामुळे महादेवांची पूजाही झाली. त्याच्याकडून नकळत घडलेल्या या पुण्यामुळे त्याला योग्य गती प्राप्त झाली.
महादेव-पार्वती विवाह कथा
काही मान्यतेनुसार या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला म्हणून महादेवांचे भक्त महाशिवरात्री मोठ्या आनंदात साजरी करतात.
ब्रम्हा-विष्णू वाद कथा
एकदा ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण यावरून भांडण सुरू झाले. या भांडणामुळे सगळीकडेच अशांतता निर्माण झाली आणि तेव्हा इतर देवतांनी ही गोष्ट महादेवांना सांगितली, तेव्हा भगवान महादेव हे मोठ्या पिंडीच्या स्वरूपात प्रकट झाले. त्या पिंडीला सुरुवात आणि शेवट नव्हता.
ब्रह्मदेव आणि विष्णू देव या दोघांना प्रश्न पडला की हा भव्य दिव्य आकार कशाचा आहे. दोघांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना त्या पिंडीची सुरुवात आणि शेवट सापडला नाही, त्यांनी पिंडी समोर हात जोडले. हात जोडताच त्यातून ओमकार ऐकू येऊ लागला.
हे भगवान महादेवांचेच स्वरूप आहे हे लक्षात आल्यावरती ब्रह्मदेव आणि विष्णू देव यांच्यातील वाद मिटला. आणि दोघेही महादेवाची पूजा करू लागले. महादेव पहिल्यांदाच पिंडीच्या स्वरूपात प्रकट झाले म्हणून त्या रात्रीला महाशिवरात्री म्हणून साजरी करू लागले.
महाशिवरात्रीचे पूजेचे नियम
- खंडित म्हणजेच तुटलेले बेलपत्र महादेवांना वाहू नये. महादेवांना अखंड बेलपत्र अर्पण करावे.
- बेलपत्र हे गुळगुळीत बाजूने पिंडीवरती अर्पण करावे.
- महादेवांच्या पिंडीला प्रदक्षिणा घालू नये.
- शिवलिंगाला हळूहळू जल अर्पण करावे.
- महादेवांना हळदी- कुंकू, सिंदूर, नारळ, तुळशी पत्र, शंख, केवड्याची फुले वर्ज्य आहेत.
- महादेवांच्या मंदिरासमोर नारळ फोडत नाही.
हे सुद्धा वाचा :-