आदीशक्ती जगन्माता आई भगवतीने या विश्वाच्या कल्याणासाठी उन्मत्त झालेल्या असुरांसोबत ९ दिवस युद्ध करून या सृष्टीला असुरांपासून मुक्त केले त्याचा आनंदउस्तव म्हणजेच नऊरात्री. अश्विन शुद्ध ।।१।। ते अश्विन शुद्ध ।।१०।। म्हणजेच दसरा किंवा विजयादशमी पर्यंत हा नवरात्री उत्सव साजरा केला जातो. देवीचा हा ९ दिवसांचा नवरात्री उत्सव दहाव्या दिवशी म्हणजे विजयादशमीला संप्पन होतो.
हिंदू धर्मामध्ये माता श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी, व श्री महाकाली यांची पूजा मोठ्या भक्तिभावे केली जाते. जे भक्त भक्तिभावाने माझी पूजा आराधना करतील त्यांच्या संकटकाळी मी मदतीला धावून जाईन असा देवीचा आशीर्वाद आहे. ज्या ज्या वेळी असुर सज्जनांना त्रास देतील त्या त्या वेळी मी अवतार घेऊन असुरांचा नाश करीन हे देवीचे वाचन आहे. म्हणून भक्त मनोभावे देवीची आराधना करतात.
आदिशक्ती माता दुर्गा देवीची रूपे
आदिशक्ती माता दुर्गा देवीची अनेक रूपे आहेत. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीची सौम्य रूपे आहेत. तर दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत. ती द्विभुजा ( २ हात ), चतुर्भुजा ( ४ हात), षडभुजा ( ६ हात), अष्टभुजा ( ८ हात), दशभुजा ( १० हात), अष्टदशभुजा ( १८ हात) तर अष्टोत्तर शत भुजा ( १०८ हात )अशा अनेक रूपात असून देवीच्या सर्व हातांमध्ये वेगवेगळी शस्त्रे आहेत.
ब्राम्ही, माहेश्वरी, कौमारी ,वैष्णवी, वाराही, इंद्राणी, चामुंडा, महालक्ष्मी या तिच्या अष्टशक्ती आहेत. कोल्हापूरची देवी अंबाबाई, अंबेजोगाई ची जगदंबा व तुळजापूरची भवानी या चतुर्भुज असून तलवार, ढाल, खड्ग व वज्र अशी आयुधे आहेत.
सप्तशृंगीच्या देवीला 18 हात असून मनीमाळ, कमळ, शंख, घंटा, तलवार, ढाल, त्रिशूळ, कुऱ्हाड, वज्र, चक्र, दंडू, शक्ती, कमांडलू, डमरू, धनुष्य, गदा, पानपात्र व बाण अशी आयुधे आहेत.
बंगाल मध्ये देवी चे स्वरूप हे काळ्या पाषाणाची व मुखातून लाल जीभ बाहेर आलेली, गळ्यात मुंडमाळ असलेली व राक्षसाच्या छातीवर त्रिशूल धरून पाय धुवून उभी असलेली कालिकामाता प्रसिद्ध आहे. बंगाल प्रांतात दुर्गा पूजा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
ब्रह्मरूप असलेली देवी जगनमाता असून तिला यज्ञात हविर्भाग ग्रहण करण्याचा अधिकार आहे. तेज, ज्ञान व शौर्य तसेच अन्यायाचा प्रतिकार करणारी शक्ती असून मंत्र समुदायात ती मातृका म्हणून निवास करते.
आदिशक्ती योगमाया देवीची निर्मिती कशी झाली? | नवरात्री कथा
1- श्री महाविष्णू जेव्हा योगनिद्रेत होते तेव्हा त्यांच्या कानाच्या मळापासून मधू – कैटभ नावाचे राक्षस निर्माण झाले ते ब्राह्मदेवाला खाण्यासाठी धावले. घाबरलेल्या ब्राह्मदेवानी श्रीविष्णूला निद्रेतून उठविण्यासाठी योगनिद्रा देवीची आराधना केली. त्यामुळे योगनिद्रा श्रीविष्णूच्या शरीराच्या बाहेर आल्याने भगवान श्री विष्णू जागे झाले. श्री विष्णू आणि मधू – कैटभ यांच्यात युद्ध झाले आणि श्री विष्णूने त्या राक्षसांचा वध केला.
2- रंभा व करंभ या दनुच्या दोन मुलांनी पुत्रप्राप्तीसाठी अनुष्ठान केले. पंचनदीत बुडी मारून तप करणाऱ्या करंभाला इंद्राने मगरीचे रूप धारण करून मारले तेव्हा वटवृक्षाखाली तपश्चर्या करणारा रंभ संतापला व तो आपले मस्तक अग्नीला अर्पण करू लागला तेव्हा अग्नीने प्रकट होऊन त्याला “येथून निघाल्यावर जी स्त्री दिसेल तिच्यापासून तुला पुत्र होईल” असा आशीर्वाद दिला. रंभाला एक म्हैस दिसली. त्याचे प्रेम त्या म्हशीवर बसले काही. काही दिवसांनी तिच्यामागे एक रेडा लागला. रंभ व रेडा यांचे युद्ध झाले व त्यामध्ये रंभ मेला. तेव्हा गर्भवती म्हैस यक्षाला शरण गेली. यक्षाने रेड्याचा वध केला. पती विरहाने व्याकुळ झालेल्या म्हशीने सती जाण्याचा निर्णय घेतला. मृत्यूपूर्वी तिला महिषासुर नावाचा मुलगा झाला. तिच्या मृत पतीच्या प्रेतातून रक्तबीज नावाचा दुसरा मुलगा झाला.
या दोघांनी “फक्त स्त्रीच्या हातून आम्हाला मृत्यू यावा” असा ब्रह्मदेवाकडून वर मिळविला. उन्मत्त शक्तिशाली महिषासुराने युद्धात देवांचा पराभव केला व स्वर्गलोक हिसकावून घेतले. सर्व देव श्री विष्णू, शिव व ब्रम्हदेव यांच्याकडे गेले. म्हैशासुराच्या कृत्यामुळे सर्व देवतांना खूप राग आला व त्यातून एक तेज प्रकट झाले त्या तेजातून एक श्री प्रगट झाली. देवांनी तिला आयुधे दिली. हिमालयाने तिला सिंह हे वाहन दिले. त्या देवीने म्हैशासुराबरोबर युद्धे केले आणि म्हैशासुराचा वध केला.
देवीची नवरात्रीमधील नऊ रूपे व त्यांची नावे
नऊरात्रीमध्ये नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची ( नवदुर्ग) पूजा केली जाते. देवी कवचामध्ये नवदुर्गांची नावे दिली आहेत. देवीची नवे आणि त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहेत.
प्रथम शैलपुत्री, ते द्वितीय ब्रह्मचारीनी, तृतीय चंद्रघंटा, ती कुष्मांडा चवथी असे, पंचम स्कंदमाता ती शष्ठ कात्यायनी असे, सप्तम कालरात्री ती, महागौरी ती अष्टमा, नवम सिध्दिदात्री नवदुर्ग यशस्विनी.
1- शैलपुत्री – राजा हिमालय यांची कन्या व श्री शंकराची पत्नी पार्वती म्हणजेच शैलापुत्री होय. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेचा दिवस दोन वर्षे वयाच्या बालिकेची शैलापुत्री या रूपात पूजा करतात. तिचे वाहन ऋषभ म्हणजेच बैल आहे. उजव्या हातात त्रिशूल, डाव्या हातात कमळ, कपाळावर चंद्रकोर आहे.
2- ब्रह्मचारीनी ( तपश्चारिणी ) – वेद व तत्वस्वरूप असलेल्या या देवीच्या उजव्या हातात जपमाळ, डाव्या हातात कमंडलू असून तिने धवल वस्त्र परिधान केलेले आहे. या देवीने श्री शंकराची पती म्हणून प्राप्ती होण्यासाठी कठोर तपसाधना केली. तिने १००० वर्षे कंदमुळे, १०० वर्ष शाखभाजी, ३००० वर्षे जमिनीवर पडलेली बिल्वपत्र व त्यानंतर पाणीही न पिता तपसाधना केली तेव्हा तिला अपर्णा म्हणून लागले त्यानंतर ब्रह्मदेवा द्वारे आकाशवाणी झाली आणि तिला श्री शंकर हे पती प्राप्त झाले. या दिवशी तीन वर्षाच्या मुलीची ब्रह्मचारीनी रूपात पूजा करावी.
3-चंद्रघंटा – लाल वस्त्र परिधान केलेले या देवीच्या मस्तकावर आणि हातात चंद्राच्या आकाराच्या घंटा असल्याने हिला चंद्रघंटा असे म्हणतात. ही देवी दशभूजा असून हातात खडक, बाण आदी शस्त्र आहेत. ती सिंह वाहिनी तसेच काही ठिकाणी ती वाघावर बसल्याचा उल्लेख आहे. देवीची मुद्रा युद्ध सिद्ध आहे. या दिवशी चार वर्षाच्या मुलींची पूजा करावी.
4- कुष्मांडा – कुष्मांडा म्हणजेच कोहळा. कू म्हणजे वाईट, उष्मा म्हणजेच ताप, अंडा म्हणजे उदर. वाईट ताप देणारा संसार जिच्या पोटात आहे. अर्थात सत्व, रज व तम रुपी संसाराचे जिने भक्षण केले आहे त्या देवीला आठ हात असून तिच्या हातात जपमाळा, कमंडलू, धनुष्य, बाण, कमळ, अमृत कलश, चक्र व गदा ही आयुधे आहेत. ही देवी सिंहावर आरुढ आहे. ही देवी सर्वांना रोजचे अन्न पुरविते.
5- स्कंदमाता – स्कंदमाता ही सिंहावर अरुढ आहे. या देवीला कमलासनी असेही म्हणतात. स्कंदाला म्हणजेच कार्तिक स्वामीला मांडीवर घेऊन बसलेल्या या देवीला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते. चार हात असलेले या देवीच्या हातात कमलपुष्पे असून एका हाताने स्कंदाला धरले असून दुसऱ्या हाताने आशीर्वाद देत आहे. या दिवशी ललिता पंचमी असते. या दिवशी सहा वर्षे वयाच्या कुमारिकेचे पूजन करावे.
6- कात्यायनी – उडीयान येथे हे देवीचे शक्तीपीठ होते, परंतु यवनांच्या काळात ते नष्ट झाले. पहिल्या चार शक्तिपीठात समावेश असलेल्या या देवीची जन्म कथा अतिसुंदर आहे. महिषासुराच्या त्रासाने त्रस्त झालेल्या देवांनी ब्रह्मा, विष्णू व शिवाची आराधना केली. तेव्हा सर्व देवांच्या तेजातून एक देवी प्रकट झाली तिची पूजा कात्यागोत्रउत्पन कृषी कात्यायन यांनी केली म्हणून या देवीला कात्यायनी हे नाव पडले.
काही ठिकाणी कात्यायन ऋषींनी देवीची आराधना करून तिला आपली कन्या होण्यास सांगितले व देवी त्यांच्याकडे कन्या म्हणून अवतरली म्हणून तिला लोक कात्यायनी या नावाने ओळखू लागले अशी देखील आख्यायिका आहे. सिंहावर अरुढ असलेली ही देवी शंख, चक्र, खडक व त्रिशूल ही चार आयुधे धारण केलेली आहे. चार भुजांची असून त्रिनेत्र आहे. काही ठिकाणी अभय व वर देणारे दोन उजवे हात व डाव्या एका हातात कमळ व दुसऱ्या हातात खडक आहे. या दिवशी सात वर्षे वयाच्या कुमारिकेची पूजन करावी.
7- कालरात्री – कालरात्री ( शुभंकरी) अंधारासारखा काळा रंग, विस्तारलेले केस, गळ्यात विजेसारखी चमकणारी माळा, तीन डोळे, भयंकर ज्वाला निघणारे नाक, गाढवावर बसलेली, चार हात असे अभय व वर मुद्रा असलेले, दोन्ही उजवे हात लोखंडी काटा व कट्यार घेतलेले दोन्ही डावे हात असे भयान रूप असलेली ही देवी भक्तांना शुभ फल देते म्हणून तिला शुभंकरि असे म्हणतात. रक्तबीजाच्या रक्ताचा थेंब जमिनीवर पडला तर त्यातून नवीन राक्षस तयार होईल. असे त्याला वरदान होते म्हणून रक्तबीजाच्या शरीरातून रक्ताचा थेंब निघताच जमिनीवर पडण्यापूर्वीच कालिका तो नष्ट करत असे. या दिवशी आठ वर्षे वयाच्या बालिकेचे पूजन करावे.
8- महागौरी – शिवप्राप्तीसाठी पार्वतीने कठोर तपश्चर्या केल्याने पार्वतीचा रंग काळा पडला. तेव्हा श्री शंकराने प्रसन्न होऊन तिला गौरवर्ण दिला म्हणून तिला महा गौरी म्हणू लागले. वृषभारूढ असलेली ही देवी धवल वस्त्र परिधान केलेली असून चारभुजांची आहे. उजव्या दोन हातातील एका हातात त्रिशूळ व एका हाताने भक्तांना अभय देत आहे. डाव्या एका हातात डमरू व दुसऱ्या हातात जपमाळा आहे. दुर्गाष्टमी, अष्टमीच्या या दिवशी चंडीपाठाने उपासना करतात या दिवशी नऊ वर्षाच्या कुमारिकांची पूजा करावी.
9- सिद्धीदात्री ( मंत्र -तंत्राची अधिष्ठात्री देवी ) – सिंह किंवा कमलासणावर बसलेली. चक्र, गदा, शंख, कमलपुष्प हे आपल्या चार हातात धारण केलीली. भगवान शंकरासह या देवीच्या कृपेमुळेच श्री शंकरास अर्धनारीनटेश्वर हे नाव मिळाले आहे. सर्वांना अष्ट सिद्धींचे म्हणजेच अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकास्य, ईशित्व व वशित्व वरदान देणाऱ्या व परमशांती व अमृतपदप्राप्ती देणाऱ्या देवीची दहा वर्षे वयाच्या कुमारिकेच्या स्वरूपात नवव्या दिवशी पूजा करावी.