गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।।
गुरुपौर्णिमा ही एक अशी परंपरा आहे जी आध्यात्मिक आणि शैक्षणिक स्थानातील सर्वच गुरूंना समर्पित होते. हिंदू कालगणने प्रमाणे आषाढ (जून-जुलै) महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
गुरु म्हणजे आपल्या जीवनातील अंधार, अज्ञान दूर करून प्रकाशाकडे नेणारा आणि दिव्य ज्ञानप्राप्तीचा मार्ग दाखवणारी व्यक्ती असते जी कुठल्याही संकटात आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी असते. या संसाररूपी भवसागरातून तरुण जाण्यासाठी गुरुचे मार्गदर्शन असणे आवश्यक आहे. साक्षात परमेश्वराला देखील सद्गुरूंची गरज वाटली म्हणून तर प्रभू श्री रामांनी वशिष्ठांचे आणि श्रीकृष्णाने संदिपनींची सेवा केली आणि त्यांना गुरु मानले.
जन्माला आल्यावरती आपली पहिली गुरु आपली आई असते, कारण आपण जे काही घडतो ते तिच्या मार्गदर्शनानेच घडतो. त्यामुळे प्रथम आपल्या आईचे आणि वडिलांचे दर्शन घ्यावे.
श्रीव्यासमुनी कोण होते? गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा का म्हणतात?
महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि तिची जोपासना महर्षी व्यासांनीच केली आहे. पूर्वी वेद हा एकच होता ऋषी व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन करून त्यांचे संपादन केले. वेदांचे चार भाग व्यासांनी केले आणि प्रत्येक विषयावर ग्रंथ लिहिले. महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. श्री व्यासांनी महाभारत सांगितले आणि श्री गणरायाने ते लिहिले. आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रीवेदव्यास यांचा जन्म झाला म्हणून या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे देखील म्हणतात. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यासांची पूजा करतात.
1. भगवान शंकर आणि सप्तर्षी यांची कथा
महादेव सदाशिव म्हणून तप करण्यात मग्न होते. भगवान शंकर ध्यानस्थ अवस्थेत असतांना ब्रह्मदेव, विष्णू आणि अन्य देवतांनी त्यांना साकडे घातले की, जगात धर्म, योग, तप, ज्ञान आणि भक्ती यांचा प्रसार व्हावा. त्यानंतर भगवान महादेवांनी समाधीतून डोळे उघडले आणि संपूर्ण सृष्टीचा विचार करून सात योग्य व पात्र शिष्य यासाठी निवडले.
गौतम, भारद्वाज, अत्री, विश्वामित्र, कश्यप, वसिष्ठ, जमदग्नी हे सप्तर्षी अतिशय ज्ञानी आणि तपस्वी होते.
महादेवांनी त्यांना तपश्चर्या, वेदज्ञान, योग, ध्यान, संन्यास, शुद्ध जीवनशैली, आणि धर्मशास्त्र याबद्दल सखोल ज्ञान दिले.
त्यानंतर महादेवांनी त्या प्रत्येक ऋषीला वेगवेगळ्या दिशेला पाठवले, प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या ऋषींनी लोकांना धर्म, नीतिमत्ता, शिक्षण, तप आणि सदाचरण याची शिकवण दिली. अशा प्रकारे भगवान शंकर “संपूर्ण ब्रह्मांडाचे पहिले आध्यात्मिक गुरू” झाले आणि सप्तर्षी त्यांचे पहिले शिष्य.
2. ऋषी व्यासमुनींची जन्म कथा
वशिष्ठ ऋषींचा मुलगा शतकीर्ती यांना गर्भात वेद मंत्राचे पठण करणारा पराशर हा मुलगा झाला. एकदा यमुना नदी पार करताना होडी वल्हविणाऱ्या धीवरकन्येची व परशर ऋषींची भेट झाली. तीचे सौंदर्य पाहून त्यांना स्त्रीसंगाची इच्छा झाली. कौमार्य भंग होणार नाही या अटीवर कन्येने पराशरांची इच्छा पूर्ण केली. पराशरांपासून तीला श्रीव्यास हा मुलगा आषाढ शुद्ध पौर्णिमेला झाला. ऋषी पराशर यांचे पुत्र असल्यामुळे श्रीव्यास यांना पराशर या नावाने देखील ओळखले जाते. पुढे ती कन्या राजा शंतनू जे हस्तिनापुर या राज्याचे राज्याधिकारी होते त्यांच्याशी तिचा विवाह झाला. त्यांनाच देवी सत्यवती या नावाने ओळखले जाते. सत्यवतीला कौमार्य अवस्थेत झालेला पुत्र श्रीव्यास हे पुढे व्दैपायन नावाच्या एका बेटावरती राहत होते म्हणून त्यांना कृष्ण व्दैपायन असे देखील म्हणतात.
3. श्री गुरु दत्तात्रेय यांची कथा
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री गुरु दत्तात्रेय यांची एक अद्वितीय आणि प्रेरणादायी कथा सांगितली जाते. दत्तात्रेय हे “त्रिगुणात्मक गुरू” म्हणजेच सत्त्व, रज, तम या तीन गुणांचे एकत्रित रूप म्हणून ओळखले जातात आणि श्री गुरु दत्तात्रेयांची शिकवण आजही गुरू-शिष्य परंपरेत अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
भगवान दत्तात्रेय यांनी तरुण वयातच सर्व गोष्टींचा त्याग करून तपश्चर्या सुरू केली. त्यांनी ज्ञान प्राप्तीसाठी फक्त वेदांचेच नव्हे तर संपूर्ण निसर्गाचे निरीक्षण केले.
या विश्वातील अनेक घटकांमधून मी जीवनाचे आणि अध्यात्माचे अनेक धडे घेतले. म्हणून हेच माझे गुरू आहेत असे श्री गुरु म्हणतात.
त्यांनी निसर्गातील २४ घटकांना आपले गुरू मानले.
दत्तात्रेयांनी शिकवले की “ज्ञान हे फक्त ग्रंथांमधूनच नाही, तर निसर्ग, लोक, प्रसंग, प्राणी आणि अनुभवांतूनही मिळते.”
त्यामुळे प्रत्येक माणसाने सतत शिकत राहावे, आणि कोणत्याही गोष्टीतून आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा, ही त्यांची शिकवण आहे.
श्री गुरु दत्तात्रेयांनी “गुरुत्व” हे संकुचित न ठेवता, संपूर्ण सृष्टीतून ज्ञान घेण्याची वृत्ती निर्माण केली. म्हणूनच गुरुपौर्णिमेला गुरु दत्तात्रयांचा मोठा उत्सव साजरा केला जातो.
श्री गुरु दत्तात्रयांचे २४ गुरू कोण?
- पृथ्वी- सहनशीलता, स्थिरता
- वायू- सर्वत्र असणे, अनासक्त राहणे
- आकाश- विशालता, अंतरंग शुद्धता
- जल- निर्मळता, शांती
- अग्नी- तेजस्विता, आत्मशुद्धी
- चंद्र- स्थितप्रज्ञता (भावना बदलत नसणं)
- सूर्य- वेळेचं मूल्य, प्रकाशदान
- कबूतर- मोहामुळे होणारा विनाश
- अजगर-अल्पाहार, संतोष
- समुद्र- गंभीरता, अथांगता
- पतंग- मोहामुळे विनाश (जसे दिव्याभोवती घिरट्या)
- मधमाशी- संचयाची लालसा – नुकसान
- हरण- मोहामुळे फसवणूक
- मासा- जिभेचा मोह – विनाश
- पिंगळा- आसक्ती नसलेली समाधी
- कुरर पक्षी- संपत्तीवरून संघर्ष
- मूल (बाळ)- निरागसता, प्रसन्नता
- युवती- स्वाभाविक लज्जा
- लोहार- एकाग्रता
- सर्प- एकांतवास, सावधपणा
- कोळी- संयम, संधीची वाट पाहणे
- कीटक व पक्षी- देहाभिमानाचा नाश
- जलकुंभ- अंतर्मुखता
- सोंड (भ्रमर)- गैरसमज व भ्रम टाळावा
गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी?
- जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपण एखादा तरी गुरू करावा असे म्हणतात. आणि त्या गुरूबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या दिवशी आपल्या गुरु बद्दल भावपूर्ण आदरांजली आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
- गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंच्या पूजनासाठी त्यांच्या स्थानी जावे. त्यांची मनोभावे पूजा करावी आपल्या गुरूंचे पाय धून त्यांना गंध, फुले, अक्षदा वहावे.
- आपल्या गुरूंचे दर्शन घेऊन गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून वस्त्र, फळं, पुस्तक आणि आपल्या शक्यतेनुसार गुरुदक्षिणा अर्पण करावी.
- आपल्या गुरूने जो काही उपदेश केला, जे काही शिकविले त्याचा अभ्यास करावा.
- गुरूंनी दिलेल्या मंत्राचा नामजप करावा.
हे देखील वाचा ;-
- दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या साजरी करण्याची योग्य पद्धत
- श्री हनुमान जयंती / अंजनेय यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
- श्री रामांना मर्यादापुरुषोत्तम असे म्हणतात? आणि रामायणातील काही गुड रहस्यांबद्दल माहिती.