गुढीपाडवा, ज्याला काही राज्यांमध्ये उगादी म्हणूनही ओळखले जाते, हा एक महत्त्वाचा सण आहे जो प्रामुख्याने भारतातील महाराष्ट्रीयन लोक साजरा करतात, चांद्र वर्षाच्या कालगणनेनुसार हा सण चैत्र महिन्यात येतो. गुढीपाडव्याला पाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा, वर्षप्रतिपदा असे देखील म्हणतात.
जसजशी फुले उमलतात आणि कडुलिंबाच्या पानांचा मधुर सुगंध हवेत पसरतो, तसतसे गुढीपाडव्याच्या – महाराष्ट्रीयन नववर्षाचे स्वागत करण्याची वेळ जवळ येत असते. मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा हा सण, हिंदु जनसमुदाय आणि मित्रांना जुन्या परंपरा आणि सांस्कृतिक उत्सवांमध्ये एकत्र आणतो आणि मराठी नवीन वर्षाच्या प्रेरणा देतो.
गुढीपाडव्याचा हा सण फक्त घरापुरता मर्यादित नसुन लोक सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका आणि मेळ्यांचे आयोजन करतात. काही ठराविक भागामध्ये लावणी आणि तमाशा यांसारखी पारंपारिक लोकनृत्ये आयोजित केले जातात. पारंपारिक पोशाख परिधान करून लोक रस्त्यावर ढोल ताशाच्या गजरात, ऊर्जा आणि चैतन्यमय वातावरणात मिरवणूका काढतात.
गुढीपाडवा २०२५ मध्ये कधी साजरा केला जाईल?
गुढीपाडवा हा रविवार, ३० मार्च २०२५ मध्ये भारतामध्ये साजरा केला जाईल. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
गुढीपाडव्याचे महत्त्व
हिंदू चंद्र कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरुवात म्हणजेच वर्षाचा पहिला महिना आणि वसंत ऋतूचा प्रारंभ म्हणून पाहिले जाते, चैत्रची सुरुवात आणि समृद्धी आणि वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक म्हणून लोक मानतात.
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी अनेक शुभ कार्यांची सुरुवात केली जातो. अनेक लोक या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात.
१. हिंदू नववर्षाची सुरुवात:
- गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन संवत्सर (हिंदू पंचांगानुसार नवीन वर्ष) सुरू होते.
- या दिवसापासून नवीन प्रारंभाला शुभ मानले जाते आणि व्यवसाय, शिक्षण, नवे उपक्रम सुरू करण्याची परंपरा आहे.
२. वसंत ऋतूचे आगमन:
- गुढीपाडव्याच्या सुमारास वसंत ऋतू सुरू होतो, जो नवीन आशा, आनंद आणि सृजनाचा काळ मानला जातो.
- निसर्गातील झाडे-फुले नव्या पालवीने बहरतात, त्यामुळे हा नूतन जीवनाचा उत्सव मानला जातो.
३. रामाच्या विजयाचे प्रतीक:
- एका आख्यायिकेनुसार, प्रभू श्रीरामाने रावणाचा वध करून आणि १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत प्रवेश केला.
- अयोध्येतील नागरिकांनी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी गुढ्या उभारल्या, म्हणून गुढीपाडव्याला विजयदिन मानले जाते.
४. शालिवाहन राजवंशाची स्थापना:
- शालिवाहन राजा गुप्तकालीन भारतात एक महत्त्वाचा योद्धा होता.
- त्याने शत्रूंवर विजय मिळवून शालिवाहन शकाचा प्रारंभ केला, म्हणून गुढीपाडवा शक संवत्सराचा पहिला दिवस मानला जातो.
५. ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली:
- पुराणानुसार, भगवान ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली, म्हणून गुढीपाडवा हा सृष्टीच्या प्रारंभाचा दिवस मानला जातो.
परंपरा आणि प्रथा
१. गुढी
गुढीपाडव्याच्या सणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गुढी उभारणे, ‘गुढी’ या शब्दाचा अर्थ या दिवशी पारंपारिकपणे फडकावल्या जाणाऱ्या ध्वजाचे प्रतीक आहे. गुढीला सामर्थ्यध्वज, ब्रह्मध्वज, विजयध्वज, आनंदध्वज, इंद्रध्वज, सद्भावध्वज या नावांनी देखील ओळखले जाते.
जी सजवलेली बांबूची काठी किंवा रंगीबेरंगी चमकदार रेशमी कपड्याने बांधलेला खांब, त्याला झेंडूची फुलांचा हार, कडुलिंबाची किंवा आंब्याची पाने आणि सगळ्यात वरती तांब्या किंवा चांदीचा कलश (भांडे) ठेऊन गुडी तयार केली जाते.
“गाठी-कडं” हे देखील गुढीला नैवेद्य म्हणून लावले जाते. कलशाला पाच बोटे हळदी- कुंकू अक्षदा लावून गुढीला ब्रह्मध्वजाय नमः म्हणून वंदन करून ही गुढी नंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर उभारली जाते. त्यानंतर गंध, फुलं, धूप, दीप, नैवेद्य या पंचोपचाराने गुढीची पूजा केली जाते. त्यानंतर दुपारी गुढी घरामध्ये काढून घ्यावी.
२. सडा-रांगोळी
गावाकडे गाईच्या शेणाचा वापर करून अंगणामध्ये सडा शिंपडला जातो, शेण नसेल तर फक्त पाणी शिंपडले जाते. त्यांनतर सुदंर रांगोळी घराच्या प्रवेशद्वाराच्यापुढे काढतात आणि शुभ मानल्या जाणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करतात.
३. पूजा, प्रार्थना आणि नैवेद्याचे पदार्थ
कुटुंब पारंपारिक पुजा आणि विधी करण्यासाठी एकत्र येतात, देवतांना विशेष पदार्थ, फळे आणि फुले अर्पण करतात. पुरणपोळी, श्रीखंड आणि पुरी भाजी यांसारखे सणाचे पदार्थ तयार करतात. पुरणपोळीचा नैवद्य करणे ही तर वर्षांनुवर्षे ची परंपरा आहे.
ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व
- गुढीपाडव्याचे मूळ पुरातन काळापासून आहे आणि त्याचे विविध पौराणिक कथांमध्ये उल्लेख आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, भगवान ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली, त्यामुळे गुढीपाडवा हा विश्वाच्या निर्मितीचा पहिला दिवस म्हणून मानला जातो.
- प्रभु “श्री राम” लंकेवरती विजयानंतर अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने गुढी उभारुन मोठ्या आनंदाने त्यांचे स्वागत केले, अशी एक कथा आहे.
- श्रीविष्णुने याच दिवशी मत्स्य अवतार धारण केला.
- इंद्रदेवाने वृत्रासुराचा वध याच दिवशी केला.
प्रादेशिक विविधता
- गुढीपाडवा प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जातो, त्याचप्रमाणे भारतातील कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील राज्यांमध्ये उगादी आणि काश्मीरमधील नवरेह अशा वेगवेगळ्या नावांनी नवीन वर्षाचा उत्सव साजरा केला जातो.
- प्रादेशिक विविधता असूनही, सणाचे वैशिष्ट्य एकच आहे आणि ते म्हणजे नवीन वर्षाचे स्वागत, आनंद, समृद्धी आणि एकोपा राखणे.
एकंदरीत, गुढीपाडवा हा नववर्षाच्या उत्सवापेक्षा कितीतरी अधिक चांगल्या विचारांचा सण आहे. ही एक परंपरा आहे जी भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि सांप्रदायिक ऐक्य असण्याचे दर्शन घडवते.
गुढीपाडवा संस्कृती, परंपरा आणि महाराष्ट्रीय लोकांच्या चिरस्थायी भावनेचा उत्सव आहे. गुढी जसजशी वाऱ्याच्या झुळूकीत डोलते, तसतशी ती समाजाच्या आशा, स्वप्ने आणि आकांक्षा घेऊन प्रत्येकाला एक नवीन दिशा देण्याचे काम करते. हा गुढीपाडवा सर्वांसाठी भरभराटीचा, आनंदाचा जावो. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!