हनुमान जयंती ही चैत्र शुद्ध पौर्णिमेला येते (इंग्रजी कॅलेंडरनुसार एप्रिल महिन्यामध्ये). श्री हनुमानांचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झालेला आहे. या धरतीवरील ७ चिरंजीवांपैकी (कधीच मृत्यू न होणारे) एक हे श्रीराम भक्त हनुमान आहेत. श्री हनुमान हे महारुद्राचे ११ वा अवतार आहेत.
श्री हनुमान जन्म कथा
राजा दशरथ यांनी जेव्हा पुत्र प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ केला, त्यातून जो पायस प्रसाद मिळाला तो प्रसाद राजा दशरथ यांनी त्यांच्या तीन राण्या कौशल्या, सुमित्रा आणि कैकयी यांना दिला. सगळ्यात आधी मला प्रसाद का दिला नाही म्हणून कैकयी राजा दशरथ यांच्याबरोबर बोलत असताना कैकयीच्या हातून तो प्रसाद घारीने पळविला.
घारीने तो प्रसाद अंजनेरी पर्वतावर ( नाशिक येथील त्रंबकेश्वर जवळ हा पर्वत आहे) पुत्र प्राप्तीसाठी तप करत असलेल्या माता अंजनीच्या हातामध्ये टाकला ( ही घार स्वर्गातील एक अप्सरा होती. ब्रह्मदेवाच्या शापाने तिला घारीचा जन्म मिळाला आणि जेव्हा ही घार कैकयीच्या हातामध्ये असलेला पायस प्रसाद उचलून अंजनी मातेच्या हातामध्ये टाकेल तेव्हा ती शाप मुक्त होईल असे ब्रह्मदेवाने तिला सांगितले ).
अंजनी मातेने तो प्रसाद ग्रहण केला. श्री हनुमान हे महारुद्राचे ( महादेव ) ११ वा अवतार आहेत. भगवान शिवांनी वायुद्वारे त्यामध्ये आपला दिव्यआत्मा ठेवला. चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी अंजनी माता यांना मारुती हा पुत्र झाला.
श्री हनुमान यांच्या आई आणि वडिलांबद्दल माहिती.
श्री हनुमान यांच्या वडिलांचे नाव केसरी व आईचे नाव अंजनी आहे. श्री हनुमान यांचे वडील केसरी हे सुमेरू पर्वताचा राजा होते. माता अंजनी या पुंजीकस्थला नावाची एक अप्सरा होती. परंतु ऋषी शापामुळे त्यांना वानर जन्म मिळाला. कुंजीर या वानराच्या इथे त्यांचा जन्म झाला. त्यानंतर राजा केसरी यांच्याबरोबर विवाह झाल्यानंतर त्यांचे नाव अंजना झाले. मारुती यांच्या आईचे नाव अंजनी असल्यामुळे त्यांना अंजनेय या नावाने देखील ओळखले जाते.
श्री मारुतीरायांचे नाव हनुमान का झाले?
जन्म झाल्यानंतर मारुतीरायांना खूप भूक लागली. आकाशीमध्ये लाल लाल अग्नीचा गोळा म्हणजे सूर्याला बघून मारुतीरायांना असे वाटले की ते एक फळ आहे. त्यामुळे त्यांनी ते फळ खाण्यासाठी आकाशामध्ये झेप घेतली. श्री मारुतीरायांनी असे केले असता संपूर्ण सृष्टी वरती संकट आले असते.
म्हणून इंद्रदेवाने त्यांना शस्त्र फेकून मारले. हे शस्त्र त्यांच्या हनुवटीला लागले आणि ते बेशुद्ध पडले. वायू देवतेने त्यांना हातावरती झेलून घेतले. वायुदेवतेने इंद्रदेव आणि इतर देवांना शासन केले आणि सर्व देव वायुदेवांना शरण आले. मारुतीच्या हनवटीला इंद्र वज्र लागल्यामुळे त्यांना हनुमान हे नाव देण्यात आले आणि मारुतीरायांना अनेक आशीर्वाद देखील देवतांनी दिले.
मारुतीरायांनी सूर्यदेवता यांच्याकडून ज्ञानग्रहण केले आणि त्यानंतर मारुतीराय किष्किंधेमधे सूर्यपुत्र वाली आणि सुग्रीव यांच्या जवळ राहू लागले.
श्रीराम आणि हनुमान यांची पहिली भेट केव्हा व कुठे झाली?
सुग्रीव आणि वाली या दोन्ही भावांमध्ये झालेल्या वादानंतर हनुमंतराय हे सुग्रीवसह, जांबुवंत, नळ आणि निळ या त्यांच्या मित्रांसोबत ऋष्यमुक या पर्वतावरती राहू लागले.
मारुतीराय जेव्हा लहान होते त्यावेळेस माता अंजनी यांनी मारुतीरायांना सांगितलेले होते की, “जो महापुरुष तुझी ब्रह्मकौपिन ओळखील ते तुझे सद्गुरु आहेत असे तो समज”. सीता शोध घेत असताना श्रीराम आणि लक्ष्मण हे ऋष्यमुक पर्वतावरती आले. विश्राम करण्यासाठी ते एका झाडाखाली बसले.
सुग्रीव यांना असा संशय आला की हे दोन मनुष्य वालीने आपणास मारण्यासाठी पाठवलेले असावे म्हणून त्याने मारुतीरायांना त्यांच्याबद्दल शोध घेण्यासाठी पाठवले. मारुती राम – लक्ष्मण ज्या झाडाखाली बसलेले होते त्या झाडाच्या वरती जाऊन बसले. त्यावेळेस श्रीराम म्हणाले “हे लक्ष्मणा! झाडावरती बसलेले हे वानर ब्रह्मकौपिन असलेले दिव्यआत्मा आहे.” प्रभू श्रीरामांच्या मुखा मधून हे शब्द ऐकताच मारुतीरायांना अंजनी मातांनी सांगितलेले शब्द आठवले.
मारुतीरायांनी आपल्या सद्गुरूची परीक्षा घेण्याचे ठरवले. मारुती यांनी झाडावरची एक फांदी तोडून प्रभू श्रीरामांच्या अंगावरती फेकली. प्रभू श्रीरामांनी बाण मारून ती फांदी तोडली आणि त्या बाणाच्या वेगामुळे मारुतीराया बेशुद्ध पडले. वायू देवतेने मारुतीरायांना प्रभू श्रीरामांच्या चरणी ठेवले आणि “याचा संभाळ करा” अशी विनंती केली. प्रभू श्रीरामांनी त्यानंतर मारुतीरायाला अनुग्रह दिला आणि सुग्रीव व राम यांच्यामध्ये मैत्री झाली.
श्री हनुमान यांना आपली शक्ती विसरण्याचा शाप कोणी दिला?
लहानपणी मारुती हे अतिशय खोडकर होते. जंगलातील ऋषीमुनी जेव्हा तपसाधना करत असे तेव्हा ते त्यांना त्रास देत होते. परंतु मारुती हे लहान असल्यामुळे ऋषीमुनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत. मारुतीच्या खोडकरपणामुळे त्यांचे आई वडील देखील चिंतेत होते. त्यांनी ऋषीमुनींना विनंती केली की मारुती हे लहान आहे तुम्ही त्यांना माफ करावे.
परंतु मारुतीरायांच्या या खोडकर वृत्तीला कमी करण्यासाठी ऋषी अंगिरा आणि भृगुवंशच्या मुनींनी त्यांना त्यांची शक्ती विसरण्याचा सौम्य शाप दिला. या शापामुळे मारुतीराय यांच्यामधील खोडकरपणा कमी झाला. मारुतीरायांना जर कोणी त्यांच्या शक्ती बद्दल स्मरण करून दिले तरच त्यांना त्यांच्यामधील शक्ती आठवत असे.
श्री हनुमान यांच्या मुलाचे नाव व त्याचा जन्म कसा झाला?
रामायणातील सर्व घटनेतील एक विशेष महत्त्वाचे म्हणजे मारुतीराय ब्रह्मचारी असून त्यांना एक पुत्र देखील होता. लंका दहन केल्यानंतर जेव्हा मारुती राय आपल्या शेपटीची आग विझवण्यासाठी समुद्रकिनारी गेले त्यावेळेस त्यांनी त्यांचा घाम टिपून फेकला आणि तो एका मगरीने गिळला.
हनुमानाच्या त्या घामापासून त्या मगरीला मकरध्वज नावाचा एक मुलगा झाला. मकरध्वज पाताळलोकमध्ये राहत होता. रावणाचा भाऊ अहिरावण जो पाताळ लोकच राजा होता याने त्याचा सांभाळ केला होता.
११ मारुतींची नावे व ते कुठे आहेत?
समर्थ रामदास स्वामींनी चाफळ आणि त्याच्या आजूबाजूंच्या गावांमध्ये या ११ मारुतींची स्थापना केलेली आहे.
१. चाफळ – दास व प्रताप मारुती
२. उंब्रज- मठातील मारुती
३. पारगाव – पारगावाचा मारुती
४. मसूर – मसूरचा मारुती
५. शहापूर – शहापूरचा मारुती / चुन्याचा मारुती
६. बत्तिसशिराळे – शिराळ्याचा मारुती
७. शिंगणवाडीचा मारुती – खडीचा मारुती
८. मनपाडळे – मनपाडळेचा मारुती
९. माजगाव – माजगावचा मारुती
१०. बाहे -बहे बोरगावचा मारुती
११. पाडळी – पाडळीचा मारुती
हे देखील वाचा ;-