2024 मध्ये राम नवमी हि १७ एप्रिल रोजी बुधवारी आहे. इंग्रजी कॅलेंडर नुसार मार्च किंवा एप्रिल मध्ये राम नवमी येते. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला प्रभू श्री रामांचा जन्म झाला. प्रभू श्री राम हे भगवान विष्णूचा सातवा अवतार आहे. रावणाचा पराभव करण्यासाठी आणि धर्म टिकविण्यासाठी स्वयं देवाने पृथ्वीवर अवतार घेतला. आणि तो दिवस राम नवमी म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
सर्व राम भक्त मनोभावे प्रभू रामाची सेवा करतात, भजन – कीर्तन करतात आणि राम कथा ऐकतात. प्रभू श्रीरामांचे नामस्मरण सतत व्हावे म्हणून तर आपल्या संस्कृतीमध्ये जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांना भेटतात तेव्हा ते हॅलो नाही, तर “राम राम” असेच म्हणतात. हो हीच आहे आपली भारतीय संस्कृती आणि आपले आराध्य दैवत मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामांची ओळख.
ऋषी वाल्मिकी यांनी लिहिलेले महाकाव्य “रामायण” हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, तर भारतीय संस्कृती आणि अध्यात्मावर खोलवर प्रभाव टाकणारा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपले आचरण आणि वागणे कसे असावे हे प्रभू श्रीरामांकडून शिकावे. महाकाव्य रामायण म्हणजे प्रभू श्रीरामांचे जीवन चरित्र.
रामायण लिहिणारे वाल्मिकी ऋषी कोण होते?
जी राम कथा ऐकल्यानंतर मन अगदी प्रसन्न होते आणि ब्रह्मानंद प्राप्त झाल्याचा अनुभव येतो अशी ही सुंदर राम कथा ऋषी वाल्मिकी यांनी लिहिली.
ऋषी प्रातेतस यांचा मुलगा रत्नाकर हा वाईट लोकांच्या संगतीमुळे दरोडेखोर वाल्ह्या झाला. एकदा नारद मुनींनी वाल्ह्याला एक प्रश्न विचारला की तु हे सर्व पाप करतोय या पापामध्ये तुझे घरचे सहभागी आहेत का? वाल्ह्या विचारात पडला, त्यानंतर वाल्ह्याने हा प्रश्न त्याच्या घरच्यांना विचारला तर घरातील सर्वांनी नाही हे उत्तर दिले. घरातील सदस्यांचे हे उत्तर ऐकून मात्र वाल्ह्याला खूप दुःख आणि त्याचबरोबर केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि तो नारद मुनींना शरण गेला.
नारद मुनींच्या सिद्धांतानुसार “नालायकाची उपेक्षा न करता त्याला प्रेमाने जवळ घेऊन नारायण करावे” आणि अगदी तसेच घडले. त्यानंतर राम नामाचा जप करण्यास त्याने सुरुवात केली. बारा वर्षांच्या तपसाधनेनंतर वाल्ह्याचा वाल्मिकी ऋषी झाला. त्यानंतर वाल्मिकी ऋषींनी सप्तकांडाचे रामायण लिहिले.
1- बालकांड
हे गौरी प्रधान कांड आहे. यामध्ये राजा दशरथाचा स्वर्गामध्ये विजय होतो. त्यानंतर दशरथाच्या हातून श्रावण बाळाचा वध, पुत्र होत नाही म्हणून राजा दशरथाने पुत्र प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ केला, प्रभू श्रीरामांचा जन्म, श्रीरामांच्या हातून राक्षसनी त्राटिकाचा वध, गौतम ऋषींच्या श्रापाने शिळा (दगड) झालेल्या अहिलेचा प्रभू श्रीरामांकडून उद्धार, सीता स्वयंवर, परशुरामदर्शन आणि अयोध्येमध्ये आगमन याबद्दल सविस्तर माहिती आहे.
2- अयोध्याकांड
या सद्गुरु प्रधान कांडामध्ये माता कैकयी हिने राजा दशरथकडून मागितलेल्या वचनामुळे प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण हे वनवासासाठी जातात. प्रभू श्रीरामांचा भाऊ भरत चित्रकूट पर्वतावरती त्यांना भेटण्यासाठी येतो. प्रभूंची समजूत घालून त्यांना परत नेण्यासाठी आग्रह करतो परंतु श्रीराम हे नाकार देतात. मग भरत त्यांच्या पादुका घेऊन अयोध्येला परत येतात आणि त्यांचा राज्याभिषेक झाल्यावरती राजगादीवरती स्वतः न बसता श्रीरामांच्या पादुका ठेवतात. भरत यांच्या नावावरूनच आपल्या देशाला भारत हे नाव पडले आहे. त्यानंतर प्रभू श्रीरामांचे नाशिकच्या पंचवटी मध्ये आगमन झाले.
3- अरण्यकांड
या भगवान प्रधान कांडामध्ये नाशिक मध्ये प्रभू श्रीराम यांनी शूर्पणखा राक्षसनीचे नाक बाण मारून कापले. खर आणि दूषण यांचा वध केला. रावणाच्या सांगण्यावरून सुवर्णमृगाचे रूप धारण करून आलेल्या मारीच याचा प्रभू श्रीरामांनी वध केला. त्याच दरम्यान रावनाने साधू वेशामध्ये माता सीतेचे हरण केले. जटायू पक्षाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु रावणाने त्याचे पंख छाटले. माता सीता रस्त्यामध्ये त्यांचे दागिने टाकत गेल्या. सीतेच्या शोधामध्ये निघालेल्या प्रभू श्रीरामांना शबरी भेट झाली. या विषयांचे वर्णन यामध्ये आहे.
4- किष्किंधाकांड
हे पर्वत प्रधान कांड आहे. यामध्ये प्रभू श्रीरामांची आणि हनुमंताची भेट होते. सुग्रीव आणि वाली या दोन्ही भावांमधील भांडणामध्ये प्रभू श्रीराम सुग्रीवशी मैत्री करून वालीचा वध करतात. आणि सुग्रीवला त्याचे राज्य परत देतात. वानरसेनेसोबत प्रभू श्रीराम लंकेकडे प्रस्थान करतात. समुद्र उल्लंघन करून हनुमान लंकेला जातात. या सर्व गोष्टींचे वर्णन या कांडा मध्ये आहे.
5- सुंदरकांड
या सुंदरकांड मध्ये हनुमानाने लंकेचे दहन केले. रावणाचा भाऊ बीभीषण याला रावणाचे वागणे पटत नसल्यामुळे तो रावणाला सोडून प्रभू श्रीरामांना शरण गेला. समुद्र ओलांडण्यासाठी वानर सेनेने दगडांवरती राम हे नाव लिहिले आणि दगडांपासून सेतू तयार केला. प्रभू श्रीरामांसह वानरसेनेचे लंकेमध्ये आगमन झाले. हे सुंदर कांड मारुती प्रधान आहे.
6- युद्धकांड
हे कांड रावण गर्वपरिहरण प्रधान आहे. यामध्ये अंगदाची शिष्टाई, धुम्राक्ष, कुंभकर्ण, इंद्रजीत यांच्या वध याबद्दल सविस्तर माहिती आहे. तसेच लक्ष्मणाला लागलेल्या बाणाचे वर्णन, प्रभू श्रीरामांनी रावणाचा केलेला वध आणि सीता शुद्धी याचे वर्णन आहे. रामेश्वरची स्थापना, प्रभू श्रीरामांचे माता सीता आणि लक्ष्मणासह अयोध्येमध्ये पुनरागमन, रामराज्यरोहन आणि सर्वांचा सन्मान, हनुमानाने स्वतःची छाती फाडून श्रीराम आणि माता सीता यांचे दर्शन घडविले. या सर्व गोष्टींबद्दल यामध्ये वर्णन केलेले आहे.
7- उत्तरकांड
हे सीता प्रधान कांड आहे. या उत्तरकांडामध्ये प्रभू श्रीरामांनी माता सीतेचा केलेला त्याग, आश्रमात गेल्यानंतर माता सीतेने लव कुश यांना जन्म दिला, श्रीरामांनी केलेला अश्वमेध यज्ञ, सीता मातेचे जमिनीमध्ये विलीन होणे, लक्ष्मणाचे पातळत जाणे आणि प्रभू श्रीरामांचे शरयू नदीमध्ये प्रवेश करून निजधामास जाणे याबद्दल सविस्तर वर्णन केलेले आहे.
प्रभू श्रीरामांचा वंश, कुळ व गोत्र
वैवष्वत मनु, इश्वाकू यांचा 37 वा वंशज सगर व त्यानंतर अंशुमान, दिलीप, भगीरथ, अंबरीश, रघु याने विश्वजीत यज्ञ केला होता त्याच्यामुळेच श्रीरामाच्या वंशाला रघुवंश असे म्हणतात. तर श्रीरामाला रघुनाथ, रघुपती, राघव, या नावाने देखील ओळखतात. रघु चा मुलगा अज यांच्या उदरी दशरथाचा जन्म झाला व दशरथाच्या पोटी प्रभू श्रीरामांनी जन्म घेतला.
गोत्र – वशिष्ठ, आडनाव – प्रमार (परमार वा पवार), देवक – तरवार, कुलदेवता – तुळजापूरची देवी, कुलदैवत – खंडोबा.
प्रभू श्रीरामांच्या परिवाराबद्दल माहिती
राजा दशरथ यांना तीन बायका होत्या कौशल्या, सुमित्रा आणि कैकयी. राजा दशरथ यांना पुत्र होत नव्हता. त्यामुळे त्यांनी पत्रकामेष्टी यज्ञ केला व त्यातून त्यांना जो पायस प्रसाद मिळाला त्यांनी त्यांच्या तीनही बायकांना तो खाण्यास दिला.
परंतु, सर्वात आधी प्रसाद मला का दिला नाही यावरून कैकयी ने प्रश्न विचारला व प्रसाद हातातच ठेवला. तो हातात ठेवलेला प्रसाद घारीने उचलून नेला आणि तो अंजनीला दिला. त्या प्रसादापासून अंजनीला हनुमान झाला. कौशल्या आणि सुमित्रा यांनी त्यांच्यातील थोडा थोडा प्रसाद कैकयीला खाण्यासाठी दिला.
या प्रसादापासून चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 12 वाजता कौशल्याच्या पोटी प्रभू श्रीरामांनी जन्म घेतला. दशमीला कैकयीला भरत आणि शत्रुघ्न हे दोन मुले झाली, तर एकादशीला सुमित्राला लक्ष्मण हा मुलगा झाला. राजा दशरथाला शांता नावाची एक मुलगी ही होती.
राजा दशरथ यांच्या मुलांचे विवाह जनकपुर (सध्या नेपाळ मध्ये सीतापुर या नावाने हे गाव ओळखले जाते) चा राजा जनक आणि त्यांचा बंधू कुशध्वज यांच्या मुलींबरोबर झाले. राजा जनकला दोन मुली सीता व उर्मिला होत्या आणि त्यांचा भाऊ कुशध्वज यांच्या दोन मुली मांडवी आणि श्रुतीकीर्ती या दोन मुली होत्या.
सीतेचा विवाह प्रभू श्री राम बरोबर आणि उर्मिला हिचा विवाह लक्ष्मणा बरोबर झाला, मांडवी हिचा विवाह भरत बरोबर आणि श्रुतीकीर्ती हिचा विवाह शत्रुघ्न बरोबर झाला.
- राम आणि सीता – लव व कुश.
- लक्ष्मण आणि उर्मिला – आनंद व चंद्रकेतू.
- भरत आणि मांडवी – तक्ष व पुष्कल.
- शत्रुघ्न आणि श्रुतीकीर्ती – सुबहू व शत्रूघाती.
प्रभू श्रीरामांना 14 वर्षाच्या वनवासासाठी माता कैकयीने का पाठवले?
ज्या आईच्या पोटी भरत सारखा पुत्र जन्माला येतो ती कैकयी वाईट असू शकते का?
देव आणि दैत्यांमध्ये जेव्हा स्वर्गात युद्ध झाले, तेव्हा राजा दशरथ स्वर्गामध्ये त्यांना मदतीला गेले त्यांच्या बरोबर कैकयी देखील होती. कैकयी मुळे राजा दशरथाला युद्धामध्ये विजय मिळाला. त्यामुळे राजा दशरथाने तिला दोन वर मागण्यास सांगितले. त्यावर कैकयी म्हणाली जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी हे वर मागून घेईन.
रामराज्यरोहनाच्या वेळेला कैकयीने तिचे दोन वर मागितले. माता कैकयी प्रभू श्रीरामांसाठी संपूर्ण आयुष्यभर वनवास मागू शकत होती. परंतु कैकयीने तसे न करता फक्त 14 वर्षे वनवास प्रभू श्रीरामांसाठी मागितला. यामागे कारणही तसेच होते.
रामांना वनवासाला पाठवण्यामागे कैकयीचा देवकार्य हा हेतू होता. रावणाने देवांना पराजित करून त्यांना बंदी खाण्यात ठेवले होते. त्या देवांना मुक्त करणे गरजेचे होते. रावणाचा वध हे फक्त प्रभू श्रीरामच करू शकतात हे सर्व देवांना माहीत होते.
प्रभू श्रीराम हे मर्यादापुरुषोत्तम होते. जर प्रभू श्री राम अयोध्या चे राजा झाले असते, तर त्यांनी कुठल्याही परकीय राज्यावर आक्रमण केले नसते. प्रभू श्रीराम हे बलवान असल्यामुळे त्यांच्यावर देखील कुठल्याही राज्याने आक्रमण केले नसते. त्यामुळे युद्धाचा प्रसंग आलाच नसता. श्रीराम हे जेव्हा अयोध्येतून बाहेर जातील तेव्हाच ते रावणाला मारू शकतील हे देवतांना माहीत होते.
देवतांनी बृहस्पतीपुत्र विकल्प याला अतिशय गुप्त पद्धतीने माता कैकयी कडे पाठविले आणि सर्वजणांचा अपवाद स्वीकारून प्रभू श्रीरामांसाठी 14 वर्षे वनवास मागावा ही माता कैकयीला विनंती केली. आपला राम हा ईश्वर अवतार आहे आणि त्याचा जन्म दैत्यांच्या नाशासाठी झालेला आहे, हे समजल्यानंतर माता कैकयीने जनअपवाद स्वीकारून प्रभू श्रीरामांना वनवासाला पाठविले.
सीतेच्या अग्नीपरीक्षेचे मूळ कारण काय होते?
काही रामायण कथाकर्त्यांच्या मते सुवर्ण मृगाची घटना घडण्यापूर्वी प्रभू श्रीरामांनी अग्नीदेवतेला आमंत्रित करून गर्भवती सितेला त्यांच्या ताब्यात दिले आणि छायासीता तयार करून आश्रमामध्ये ठेवली. लंकेवरील विजयानंतर छायासीता अग्नीमध्ये नष्ट करून पत्नी सीता परत आणण्यासाठी प्रभू श्रीरामांनी माता सीतेला अग्निपरीक्षा देण्यास सांगितली.
मारीचीने इच्छा नसताना का सुवर्ण मृगाचे रूप धारण केले?
जेव्हा रावणाने मारीचीला सुवर्णमृगाचे रूप धारण करून सीता हरणासाठी मदत करण्यास सांगितले, तेव्हा राक्षस मारीची म्हणाला तुझ्या या पापामध्ये मी सहभागी होणार नाही. मग रावणाने त्याला मारण्याची धमकी दिली. तेव्हा मारीची म्हणाला तुझ्यासारख्या कपटी राजाच्या हातून मरण्यापेक्षा श्रीरामांच्या हातून मोक्ष प्राप्ती मिळेल. म्हणून मारीचीने सुवर्णमृगाचे रूप धारण केले होते.
हे देखील वाचा ;-