आषाढी एकादशी जिला देवशयनी एकादशी असे देखील म्हणतात. ही देवशयनी एकादशी आषाढ महिन्यात येते म्हणून तिला आषाढी एकादशी म्हणून ओळखले जाते. आषाढी एकादशीला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातून लाखो वारकरी ( पांडुरंगाचे भक्त ) विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरला पायी चालत जातात. यालाच पंढरीच्या पांडुरंगाची वारी असे म्हणतात. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा हा सर्वात मोठा आनंद उत्सव आहे.
दक्षीण काशी म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील पंढरपूर हे गाव सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. वारकऱ्यांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेले पंढरपूर भीमा नदीच्या काठावरती वसलेले आहे. भीमा नदीला पंढरपूर मध्ये “चंद्रभागा” असे देखील म्हणतात, कारण पंढरपुरात तीचे पात्र चंद्राकृती आहे. तसेच प्रजापती दक्ष यांनी चंद्राला श्राप दिला होता, चंद्रदेवाने या नदीमध्ये स्नान केल्यामुळे तो श्रापातुन मुक्त झाला आणि चंद्राचा शीनभाग गेला म्हणून भिमानदीला चंद्रभागा असे म्हणतात.
आषाढी एकादशी म्हणजे काय? आषाढी एकादशी चे महत्व काय? एकादशीची कथा
कुंभ नावाच्या दैत्याचा मुलगा मृदुमान्य याने देवतांचा छळ करून त्याची सर्व सत्ता बळकावली त्यामुळे सर्व देव त्याच्या भीतीने त्रिकुट पर्वतावरील एका गुहेमध्ये लपून बसले. परंतु तो दैत्य त्यांचा पाठलाग करत त्या गुहेच्या दरवाजाजवळ थांबला. यामुळे घाबरलेल्या सर्व देवांना उपवास घडला आणि त्यांच्या श्वासातून एक दिव्या स्त्री निर्माण झाली. तो दिवस होता आषाढ शुद्ध ११. सर्व देवतांनी त्या स्त्रीचे नाव एकादशी ठेवले. या एकादशीने मृदुमान्य दैत्याचा वध करून देवतांना संकटमुक्त केले.
याच दिवशी भगवान श्री विष्णू हे विश्राम करण्यासाठी क्षीरसागरात योगनिद्रेत जातात. त्यामुळे या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो. आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीपासून ते कार्तिक महिन्यातील देवप्रबोधनी एकादशीपर्यंत भगवान श्री विष्णू हे निद्रिस्त असतात. या ४ महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असे म्हणतात.
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र कसे निर्माण झाले ?
ओवी – पुंडलिका भेटी परब्रम्ह आले गां, चरणी वाहे भीमा उद्धरी जागा.
भगवान पांडुरंग आणि भक्त पुंडलिक यांच्यामधील संबंध?
प्रभू श्रीरामांचे पूर्वज इक्ष्वाकु यांचा नातू व मांधाताचा मुलगा मचकुंद हे देव आणि दानवांच्या युद्धामध्ये देवतांना मदत करण्यासाठी स्वर्गात गेले. दानवांचा नाश करून देवांना विजय मिळवून देणाऱ्या मचकुंदाने काहीतरी मागावे अशी इंद्रदेवाने त्यांना विनंती केली. मी अत्यंत थकल्यामुळे मला निवांत झोप द्या अशी मचकुंदाने इंद्रदेवाकडे मागणी करताच आपण झोपल्यावर कोणी उठविले व आपली दृष्टी त्याच्यावर पडली तर ती व्यक्ती जळून भस्म होईल. इंद्रादेवाने असा वर मचकुंदला दिला. त्यानंतर थकलेला मचकुंद एका गुहेत येऊन झोपला.
त्यानंतर बराच काळ लोटला, भगवान श्रीकृष्णाचा काळ सुरू झाला. कालयवन नावाचा एक वीर योद्धा होता त्याने नारदमुनींना विचारले की माझ्याबरोबर युद्ध करेल असा धरतीवर कोणी वीर आहे का? त्यावर नारदमुनींनी त्याला श्रीकृष्णाचे नाव सुचवले. मग कालयवन श्रीकृष्णाकडे युद्धासाठी निघाला. त्याच वेळी कंसाचा सासरा जरासंध त्याच्या मुलींना वैधव्य आले म्हणून तो ही श्रीकृष्णासोबत युद्ध करण्यासाठी निघाला होता. या सर्व प्रकारामध्ये जनतेची कुठलीही हानी होऊ नये म्हणून भगवान श्रीकृष्णाने गुजरात प्रांतातील समुद्रकिनारी द्वारका नगरी तयार केली आणि मथुरेतील सर्व लोकांना तिथे सुखरूप नेऊन ठेवले.
दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण स्वतः मथुरेच्या वेशीजवळ निशस्त्र एकटेच बाहेर आले आणि जवळच असलेल्या पर्वताकडे पळू लागले जिथे मुचकुंद झोपलेला होता. हे बघून कालयवनाने त्यांचा पाठलाग केला. श्रीकृष्णाने त्यांचा शेला मुचकुंदच्या अंगावरती टाकला आणि बाजूला लपून बसले. कालयवन गुहेत आल्यानंतर त्याला असे वाटले श्रीकृष्ण थकल्यामुळे तिथे झोपला असावा म्हणून त्याने त्याच्यावर प्रहार केला आणि मुचकुंद झोपेतून जागा झाला आणि त्याची दृष्टी कालयवनावर पडली इंद्राच्या वरदानाप्रमाणे तो भस्म झाला.
त्यानंतर श्रीकृष्ण मुचकुंदासमोर आले. श्रीकृष्णाचे मनोहर रूप पाहून तो आनंदित झाला. श्रीकृष्ण मुचकुंदाला म्हणाले तू मला वाचवलेस काहीतरी माग. त्यावर मुचकुंद म्हणाला या जन्मामध्ये माझ्याकडून युद्ध आणि झोप याशिवाय काहीच झाले नाही. मला भक्ती करून ब्रह्मानंद मिळविण्याची फार इच्छा आहे. त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणाले पुढच्या जन्मी तू पुंडलिक या नावाने जन्म घेऊन माझा भक्त होऊन जगप्रसिद्ध होशील.
भक्त पुंडलिक कोण होता ?
मुचकुंद पुढे जानूदेव आणि मुक्ताबाई या ब्राम्हण दाम्पत्याच्या घरी पुंडलिक या नावाने पंढरपूर मध्ये जन्माला आला. पुंडलिक लग्नानंतर बाईल वेडा झाला होता. त्याने बायकोला खांद्यावर घेऊन आई वडिलांसोबत काशी यात्रेला निघाला. वाटेत मुक्कामासाठी ते कुक्कुट मुनींच्या आश्रमात थांबले. पुंडलिक जेव्हा पहाटे उठला तेव्हा त्याला अनेक सुंदर स्रिया आश्रमाची झाडलोट आणि सडा रांगोळी करताना दिसल्या त्याने त्या स्रियांना विचारले तुम्ही कोण आहात? तेव्हा त्यांनी सांगितले आम्ही गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, कावेरी, कृष्णा इत्यादी नद्या स्त्री रूप धारण करून मातृ पितृ भक्ती करणाऱ्या कुक्कुट मुनींच्या सेवेसाठी इथे येतो इतके सांगून नद्या अदृश्य झाल्या. परंतु त्यांचे हे बोलणे ऐकून मात्र पुंडलिकाला पश्चाताप झाला. तो आई वडिलांना घेऊन परत पंढरपूरला आला आणि त्यांची सेवा करू लागला.
पांडुरंग पुंडलिकाला भेटण्यासाठी पंढरपूरला का आले ?
पुढे काही कारणाने माता रुक्मिणी भगवान श्रीकृष्णावर रुसून पंढरपुरातील दिंडीरवनामध्ये ( चिंचेच्या वनात ) आल्या. त्यांचा शोध घेण्यासाठी श्रीकृष्ण देखील पंढरपूर मध्ये आले. रुख्मिणीचा शोध घेता घेता ते पुंडलिकाच्या घराजवळ आले. माता पित्याबद्दल पुंडलिकाची भक्ती बघून श्रीकृष्ण त्याला भेटण्यासाठी गेले. देवाने पुंडलिकाला हाक मारली तेव्हा पुंडलिकाने त्याच्या जवळील वीट देवाकडे फेकली आणि या विटेवरती आपण उभे राहा अशी देवाला प्रार्थना केली. विटेवरती उभा राहिला तो श्री विठोबा. श्री विठोबा पुंडलिकाची भक्ती बघून तिथेच रामाला आणि सर्व भक्तांचा उद्धार करीत पंढरपूरला विटेवरती उभा आहे. भक्त पुंडलिकामुळे श्री विठ्ठल आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये आले म्हणून या एकादशीला फार महत्व आहे.